कॅन्सरग्रस्त म्हाताऱ्या आईची मृत्यूशी झुंज, संपत्ती हडपून मुलांनी सोडले वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 02:37 PM2021-12-14T14:37:17+5:302021-12-14T15:23:50+5:30
कॅन्सरग्रस्त म्हाताऱ्या आईची जमीन हडपून पाच मुलांनी तिला वाऱ्यावर सोडल्याचा संतापजनक प्रकार कुही तालुक्यातील पाचगाव येथे उघडकीस आला आहे.अतिशय भयावह परिस्थितीत त्या वृद्धेची मृत्यूशी संघर्ष सुरू आहे.
नागपूर : म्हातारपण हे माणसाचं दुसरं बालपण असते अस म्हणतात. या काळात व्यक्तिंना आपुलकीची मानसिक आधाराची गरज असते. मात्र, आजकाल अनेकजण आपला फायदा निघाल्यानंतर आपल्या वृद्ध आईवडिलांना सोडून पळ काढतात. असाच एक प्रकार कुही तालुक्यातील पाचगाव येथे उघडकीस आला आहे. कॅन्सरग्रस्त म्हाताऱ्या आईची जमीन हडपून पाच मुलांनी तिला वाऱ्यावर सोडले असून अतिशय भयावह परिस्थितीत त्या वृद्धेची मृत्यूशी संघर्ष सुरू आहे.
कुही पाचगाव येथील इंदिराबाई हटवार (वय ८०) यांना कॅन्सरसारखा गंभीर आजार जडला. आजारात मुले सेवा करतील या आशेने वृद्धेने आपली संपत्ती पाच मुलांच्या नावे करून दिली. मात्र, जमीन मिळाल्यावर पाचही मुलांनी आजारी आईची सेवा करण्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, त्यांचा आजार गंभीर होऊन त्याची दुर्गंधी येऊ लागल्यावर मुलांनी तिला जेवण, पाणी देण्यासही नकार दिला. त्या वृद्धेची अवस्था अत्यंत वाईट झाली असून त्यांना स्वत:च्या पायावरदेखील उभ राहता येत नाही. अशातच, मुलांनी केलेल्या अमानवीय व्यवहाराने ही वृद्धा खचून गेली, त्यांनी याबाबत आपल्या मुलीच्या मुलाला माहिती दिली.
नातू राजेश बावनकुळे याने वृद्धेला धंतोलीतील एका सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल केले. राजेश सध्या आजीची सेवा करीत आहे. दरम्यान, वृद्धेच्या मुलांनी त्यालाही शिवीगाळ करून धमकी दिली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली मात्र, पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे नातू राजेश बावनकुळे याने सांगितले.
सध्या, या आजींवर नागपुरातील एका सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अतिशय नाजूक आहे. याप्रकरणी नातू राजेशने पत्रपरिषद घेऊन वृद्धेच्या मुलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.