लिफ्ट घेऊन आजीबाई गावाकडे निघाल्या, पोकलॅंड मशीनचा पंजा काळ बनून आला
By योगेश पांडे | Published: September 14, 2023 05:40 PM2023-09-14T17:40:34+5:302023-09-14T17:41:32+5:30
पोकलॅंड मशीनचा पंजा डोक्यावर लागल्याने दुचाकीवरील ८० वर्षीय महिलेचा मृत्यू
नागपूर : रस्त्याच्या बांधकामांच्या कामांमध्ये अनेकदा हलगर्जी दिसून येते. मात्र एका कामादरम्यान दाखविलेल्या बेजबाबदारपणामुळे एका ८० वर्षीय महिलेचा नाहक बळी गेला. पोकलॅंड मशीनचा पंजा डोक्यावर लागल्याने दुचाकीवर मागे बसून जाणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली.
रुखमाबाई सुखदेव पाटील (८०) असे मृतक महिलेचे नाव आहे. त्या चक्की खापा या गावातील रहिवासी होत्या. बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास महेश नागनकर (३४, चक्की खापा) हा सुटी असल्याने केस कापण्यासाठी गेला होता. तो गावाकडे परतत असताना त्याला रुखमाबाई रस्त्यावर उभ्या असलेल्या दिसल्या. त्याने त्यांना दुचाकीवर बसविले व ते बोखारा टी पॉईंटकडून गावाकडे निघाले.
गावाजवळ रस्त्याचे काम सुरू होते. तेथील पोकलॅंड मशीनच्या चालकाने बेजबाबदारपणा दाखविला व पोकलॅंडचा पंजा थेट दुचाकीवरील दोघांच्याही डोक्यावर आदळला. यात महेश व रुखमाबाई दोघेही खाली पडले. रुखमाबाई यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी मेयो इस्पितळात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले तर महेशवर उपचार सुरू आहेत. महेशच्या तक्रारीवरून पोकलॅंड चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.