राजा गेला मंदिर बांधायला, उभारला लोह कारखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2022 02:49 PM2022-04-23T14:49:41+5:302022-04-23T15:05:35+5:30
८०० वर्षांपूर्वी विदर्भातील सर्वात माेठ्या या लाेह कारखान्याचा शाेध पुरातत्त्व विभागाने नाही, स्थानिक अभ्यासकांनी लावला.
नागपूर : इसवी सन बाराव्या शतकातली गाेष्ट. त्यावेळच्या चंद्रपुरातील राजाला भव्य मंदिर बांधायचे हाेते. मात्र दगडांना आकार देण्यासाठी छन्नी, हाताेडा अशा साहित्याची गरज हाेती. या परिसरात लाेह खनिज मुबलक प्रमाणात असल्याचा शाेध त्यांनी घेतला. मग काय, लाेखंडाला वितळवून साहित्य बनविण्याचा कारखानाच तेथे सुरू केला. ८०० वर्षांपूर्वी विदर्भातील सर्वात माेठ्या या लाेह कारखान्याचा शाेध पुरातत्त्व विभागाने नाही, स्थानिक अभ्यासकांनी लावला.
चंद्रपूरहून १५ किलाेमीटर अंतरावर मूल राेडवर ताडाेबालगतच्या जंगलात एक भव्य असे प्राचीन शिवमंदिर आहे. खगाेल अभ्यासक प्रा. सुरेश चाेपणे यांना काही वर्षांपूर्वी या परिसरात फिरताना हे लाेह साहित्य दिसून आले हाेते. दरम्यान, लाॅकडाऊनच्या काळात आपल्या सहकाऱ्यांसाेबत पावडे, कुदळ घेऊन हा परिसरात काही प्रमाणात खाेदकाम केले. तेव्हा आश्चर्यकारक रहस्य भूगर्भातून बाहेर आले. येथे एक किलाेमीटरच्या परिसरात ३०च्यावर भट्ट्या हाेत्या. येथे छन्नी, हाताेड्यासह तलवारी, ढाल आदी साहित्य तयार करण्याचे साचे पडले हाेते. माेठ्या प्रमाणात लाेह साहित्यही हाेते. हा शाेध पुरातत्त्वाचा खजिनाच हाेता.
राजा परमारांनी बांधली चार मंदिरे
राजस्थानचे राजे जयदेव परमार यांनी चालुक्यांचा पराभव केल्यानंतर त्यांची राजवट या परिसरात हाेती. त्यांनीच या परिसरातील लाेह खनिज शाेधून हा कारखाना सुरू केला. पुढे माेठमाेठ्या दगडांना आकार देणाऱ्या लाेह साहित्याची निर्मिती करून त्यांनी जिल्ह्यात चार मंदिरे बांधली. जंगलात असलेले प्राचीन शिवमंदिर त्याचा पुरावा आहे. हा कारखाना किमान एक किमी परिसरात पसरला असल्याचा अंदाज प्रा. चाेपणे यांनी व्यक्त केला.
पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष
या परिसरात उत्खनन झाल्यास नानी, भांडी असे माेठ्या प्रमाणात अवशेष सापडण्याची शक्यता असल्याचे प्रा. चाेपणे म्हणाले. पुरातत्त्व विभागाला याबाबत अवगत करण्यात आले; पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्याकडे निधी नसल्याने आधीच शेकडाे वारसास्थळे उत्खननाविना खितपत पडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
नागपूर विद्यापीठाने उत्खनन करावे
पुरातत्त्व विभाग दुर्लक्ष करीत असल्याने या परिसरात राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहास व पुरातत्त्व विभागाने उत्खनन करावे, अशी इच्छा प्रा. चाेपणे यांनी व्यक्त केली. याबाबत विद्यापीठाला निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा परिसर ताडाेबाच्या क्षेत्रात प्रादेशिक वनविकास महामंडळाच्या अखत्यारित आहे. त्यामुळे उत्खननासाठी वनविभागाची परवानगी घेणे आवश्यक ठरणार आहे.