दिल्लीच्या कोळसा व्यापाऱ्याचे ८१ लाख हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 12:15 AM2021-02-21T00:15:16+5:302021-02-21T00:16:47+5:30
81 lakh grabbed, crime news मित्राच्या मध्यस्थीने नागपुरातून कोळसा विकत घेऊ पाहणाऱ्या दिल्लीच्या एका व्यापाऱ्याला वाठोड्यातील एका कोलमाफियाने ८१ लाखांचा गंडा घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मित्राच्या मध्यस्थीने नागपुरातून कोळसा विकत घेऊ पाहणाऱ्या दिल्लीच्या एका व्यापाऱ्याला वाठोड्यातील एका कोलमाफियाने ८१ लाखांचा गंडा घातला. विशेष नवीन अग्रवाल (वय ३४, रा. लॉ कॉलेज चौकाजवळ, नागपूर) असे मध्यस्थ व्यापाऱ्याचे नाव आहे.
अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे दिल्लीचे कोळसा व्यापारी मित्र नवीन केजरीवाल यांनी गेल्या वर्षी नागपूर व आजूबाजूच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात चांगला कोळसा निघतो, तो विकत घ्यायचा आहे, असे सांगितले. केजरीवाल यांच्या ऑर्डरवरून विशेष अग्रवाल यांनी मध्यस्थ म्हणून भूमिका वठवत आरोपी सय्यद सादिक अली पटेल (वय ५१, रा. आईस कंपनीसमोर वाठोडा) याच्याशी संपर्क साधला. त्याने कोळसा विकत देण्याची तयारी दाखवून २४ डिसेंबर २०२० ते १६ जानेवारी २०२१ या कालावधीत अग्रवाल यांच्या माध्यमातून ८१ लाख रुपये घेतले. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा व्यवहार झाला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे आरोपी पटेलने कोळसा दिलाच नाही. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर अग्रवाल यांनी गणेशपेठ पोलिसांकडे तक्रार नोंदवली. ठाणेदार भारत क्षीरसागर यांनी या प्रकरणाची चौकशी करून घेतल्यानंतर आरोपी सय्यद सादिक अली पटेल याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
बँकेतून धूम ठोकली
आरोपी सादिकच्या बोलण्यावरून व्यवहार संशयास्पद वाटत असल्याने काही दिवसांपूर्वी अग्रवाल यांनी सादिकसोबत आपला एक कर्मचारी पाठवला. यावेळी सादिकने बँक अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर ‘शुगरचा पेशंट असल्याचे म्हणत, लगेच बाहेरून येतो’, असे सांगितले अन् बँकेतून धूम ठोकली. तेव्हापासून तो फरारच आहे.