मायबाप सरकार डोळे मिटल्यावर मानधन वाढविणार काय? ८१ वर्षांचे वृद्धाचा केविलवाणा सवाल
By दयानंद पाईकराव | Published: December 21, 2022 06:01 PM2022-12-21T18:01:58+5:302022-12-21T18:09:32+5:30
८१ वर्षाचे वृद्ध कलावंत कृष्णा सोनबाजी घोडमारे यांनी मांडली व्यथा
नागपूर : कलावंतांना आयुष्यभर प्रवास करावा लागतो. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी ते सतत या गावातून त्या गावात जाऊन समाजप्रबोधनाचे, मनोरंजनाचे काम करतात. परंतु एवढे सगळे करूनही शासन मानधनात वाढ करीत नसेल तर आयुष्यभर केलेल्या कष्टाला किंमत उरत नाही. त्यामुळे मायबाप सरकार डोळे मिटल्यानंतर मानधन वाढविणार आहे काय? असा केविलवाणा प्रश्न उपस्थित करून वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील ८१ वर्षाचे वृद्ध कलावंत कृष्णा सोनबाजी घोडमारे यांनी आपली व्यथा मांडली.
वृद्ध कलावंतांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करावी यांसह विविध मागण्यांसाठी भारतीय कलाकार शाहीर मंडळ व महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या वतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. टेकडी मार्गावर पोलिसांनी हा मोर्चा अडविला. मोर्चात वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील ८१ वर्षांचे वृद्ध कलावंत कृष्णाजी सोनबाजी घोडमारे हे सुद्धा सहभागी झाले होते. कृष्णाजी यांनी आयुष्यभर कलावंत म्हणून कार्य केले.
संत तुकडोजी महाराज, संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांचे भजन करून ते गावोगाव समाजप्रबोधन केले. त्यासाठी आपल्या आयुष्याचे ४० वर्षे त्यांनी झिजविले. परंतु त्या मोबदल्यात तुटपुंजे मानधन शासनाच्या वतीने त्यांना मिळत आहे. हे मानधन वाढविण्यासाठी आजपर्यंत अनेकदा शासन दरबारी येरझारा घालूनही पदरात काहीच पडले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मायबाप सरकार डोळे मिटल्यावर मानधन वाढविणार काय? असा संतप्त सवाल उपस्थित करून शासनाच्या कलावंतांच्या प्रती असलेल्या असंवेदनशीलतेवर त्यांनी बोट ठेवले.