उपराजधानीच्या अग्निसुरक्षेसाठी ८२२ कर्मचाऱ्यांची गरज, आहेत केवळ २६५
By मंगेश व्यवहारे | Published: July 4, 2023 02:10 PM2023-07-04T14:10:35+5:302023-07-04T14:12:48+5:30
नियमानुसार दोन लाख लोकसंख्येमागे हवे एक अग्निशमन केंद्र
नागपूर : उपराजधानीची लोकसंख्या सुमारे ३५ लाखाच्या घरात गेली आहे. लोकसंख्येच्या अनुपातात शहराच्या सुरक्षेसाठी किमान ८२२ कर्मचाऱ्यांची गरज आहे. परंतु सद्या शहराची अग्निसुरक्षा २६५ कर्मचाऱ्यांच्या हाती आहे. शहराचा विस्तार वाढत असताना पायाभूत सोयीसुविधा भक्कम करणे आवश्यक आहे. त्यातल्या त्यात नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या सेवांचे सक्षमीकरण होणे आवश्यक आहे. या सेवांचे सक्षमीकरण मनुष्यबळाच्या दृष्टीने महत्वाचे ठरते.
महापालिकेमध्ये सर्वाधिक दयनिय अवस्था अग्निशमन विभागाची झाली आहे. १९६५ साली पाच अग्निशमन केंद्र अस्तीत्वात होती. त्यावेळी १९३ कर्मचारी कार्यरत होते. अग्निशमन कायद्यानुसार २ लाख लोकसमंख्येमागे १ अग्निशमन केंद्र असणे आवश्यक आहे. सद्या ९ अग्निशमन केंद्र सुरू आहेत. २६५ कर्मचारी कार्यरत आहेत. अत्यावश्यक सेवा म्हणून राज्य सरकारने वैद्यकीय व अग्निशमन विभागातील पदे भरण्यास मंजूरी दिली आहे. त्यानुषंगाने नवीन २०० पदे मंजूर करण्यात आली आहेत. कर्मचाऱ्यांसंदर्भातील परिस्थिती गंभीर असून, तातडीने पदे भरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
- ही महत्वाची पदे आहेत रिक्त
फायरमन, लिडींग फायरमन, चालक किंवा यंत्रवाहक, वायरलेस ऑपरेटर, सब ऑफिसर्स, स्टेशन ऑफिसर, फायर ऑफिसर, डेप्युटी फायर ऑफीसर ही महत्वाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. विभागात सद्या ५५७ अधिकारी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहे. अग्निशमन विभागात सेवानिवृत्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने पदांची भरती झाल्यास अग्निशमन यंत्रणा कोलमडण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. अग्निशमन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची आवश्यकता आहे.