जिल्ह्यात वीज बिलाची थकबाकी ८३ कोटी रुपये; वसुलीसाठी वरिष्ठ अधिकारीही मैदानात
By आनंद डेकाटे | Published: December 29, 2023 07:47 PM2023-12-29T19:47:29+5:302023-12-29T19:47:42+5:30
महावितरणला टेंशन
नागपूर : जिल्ह्यातील वीज ग्राहकांवर थकबाकी ८३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यातील निम्मी थकबाकी ही पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांची आहे. थकबाकी वाढल्याने महावितरणचे टेन्शन वाढले आहे. वसुलीसाठी वरिष्ठ अधिकारीही मैदानात उतरले असून नागरिकांना बिले भरण्याचे आवाहन करत आहेत. थकबाकीदारांची वीजही कापली जात आहे.
जिल्ह्यात दर महिन्याला सरासरी ३०० कोटी रुपयांचे वीज बिल वितरित होत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. सध्या जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे ८३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी ७० कोटी रूपये तर एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहे. गेल्या महिन्यात १०० कोटी रूपयाची थकबाकी होती. त्या तुलनेत या महिन्यात परिस्थिती थोडी सुधारली असली तरी महावितरणचा ताण कायम आहे.
वारंवार आवाहन करूनही वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम अधिक गतिमान करण्यात आली आहे. या मोहिमेत महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांच्यासह अनेक अभियंते, अधिकारीही मैदानात उतरले आहेत.
महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी महाल भागातील जानकीनगर, तुळशीबाग व परिसरातील अनेक थकबाकीदार ग्राहकांची भेट घेत, थकबाकीचा भरणा त्वरित करण्याचे आवाहन केले. याशिवाय थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले. नागपूर ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक यांनीदेखील आपल्या सहकाऱ्यांसोबत आज सावनेर विभागाअंतर्गत सुरू असलेल्या थकबाकी वसुली मोहिमेत भाग घेत, थकबाकीदार ग्राहकांची भेट घेत वीजबिलाचे पैसे त्वरित भरण्याचे आवाहन केले.
शनिवारी व रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरू राहणार
वीज ग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी ३० व रविवारी ३१ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे. यासोबतच वीज ग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाइटवर तसेच महावितरणच्या मोबाइल ॲपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पद्धतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो.