RTMNU : 'सिनेट' निवडणुकीत ८३.६८ टक्के मतदान; मंगळवारी मतमाेजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2022 03:17 PM2022-11-21T15:17:33+5:302022-11-21T15:20:59+5:30
प्राचार्य निर्वाचन क्षेत्राचे ९६.७१ टक्के मतदान
नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूरविद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघ वगळता विद्वत परिषद, अध्ययन मंडळ (बीओएस) सिनेटच्या रविवारी निवडणुका शांततापूर्ण पार पडल्या. निवडणुकीत शिक्षक, प्राचार्य व व्यवस्थापन प्रतिनिधी मतदारांपैकी ८३.६८ टक्के मतदारांनी मतदान केले.
बातमी लिहिस्तोवर मिळालेल्या माहितीनुसार, सिनेटच्या प्राचार्य निर्वाचन क्षेत्राचे सर्वाधिक ९६.७१ टक्के मतदान झाले. याशिवाय विद्वत परिषदेच्या व्यवस्थापन प्रतिनिधी निर्वाचन क्षेत्राचे ९४ टक्के मतदान झाले. विद्वत परिषदेच्या शिक्षक निर्वाचन क्षेत्रासाठी ८२.२९ टक्के आणि प्राचार्य निर्वाचन क्षेत्रात ८२.२४ टक्के मतदान झाले. सिनेटच्या शिक्षक निर्वाचन क्षेत्राचे ८१.७३ टक्के मतदान झाले. यासह १७ अध्ययन मंडळ निर्वाचन क्षेत्रात ९४.६५ टक्के मतदान झाले. विद्यापीठाचे कुलसचिव व निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ. राजू हिवसे यांनी मतदान शांततापूर्ण झाल्याचे सांगितले. काेणत्याही मतदान केंद्रावर गडबड झाल्याची तक्रार नाही. मतदानासाठी विद्यापीठाच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या सर्व क्षेत्रांत एकूण ९५ मतदान केंद्र तयार केले हाेते. रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान चालले. त्यामुळे साेमवारी सकाळपर्यंत मतपेट्या पाेहोचतील. मंगळवारी सकाळी १० वाजेपासून मतमाेजणी सुरू हाेईल.
निवडणुकीसाठी रविवारी सकाळपासून उमेदवार आणि संघटनांचे पदाधिकारी सक्रिय हाेते. मात्र, सिनेट व विद्वत परिषदेच्या शिक्षक निर्वाचन क्षेत्रात गेल्या वेळीपेक्षा यावेळी कमी मतदान झाले. गेल्या निवडणुकीत सिनेट व विद्वत परिषद निवडणुकीत ९० टक्के मतदान झाले हाेते. यावेळी मतदान कमी झाल्याने उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे. कमी मतदान झाल्याने पराजय सहन करावी लागण्याची भीती उमेदवारांमध्ये आहे. कालपर्यंत आपला विजय निश्चित मानणाऱ्या उमेदवारांचीही चिंता वाढली आहे.
समाेर आली नाराजी
शिक्षक मतदारसंघात मतदान करताना शिक्षकांची नाराजी समाेर आली. सकाळपासून उमेदवार आणि संघटनांच्या पदाधिकारी शिक्षकांना मतदानासाठी संपर्क करीत हाेते. अनेक प्रतिनिधींनी गेल्या पाच वर्षांत शिक्षकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आराेप करीत शिक्षकांनी मतदान करण्यास नकार दिला.