माझी लाडकी बहीणचे शहरात ८४ हजार अर्ज जमा
By मंगेश व्यवहारे | Updated: July 17, 2024 12:01 IST2024-07-17T11:49:15+5:302024-07-17T12:01:57+5:30
Nagpur : सुट्टीच्या दिवशीही अर्ज स्वीकृती केंद्र राहणार सुरू

84 thousand applications submitted in the city of 'Majhi ladki bahin'
नागपूर : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे सुरू असलेल्या प्रभागनिहाय अर्ज स्वीकृती केंद्रांवर अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ८४८८४ अर्ज जमा झालेले आहे. विशेष म्हणजे नागपूर शहरातील दहाही झोनमध्ये कार्यरत प्रभागनिहाय अर्ज स्वीकृती केंद्र सुट्टीच्या दिवशी देखील सुरू राहणार आहेत.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेद्वारे २.५ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या परिवारातील महिलांना प्रतिमाह १५०० रुपये आर्थिक सहकार्य मिळणार आहे. या योजनेचा शहरातील जास्तीत जास्त महिलांना लाभ व्हावा यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या सर्व झोन कार्यालयांमध्ये तसेच प्रत्येक प्रभागामध्ये अर्ज स्वीकृती केंद्र सुरू करण्यात आले आहेत. अर्ज स्वीकारताना महिलांना कागदपत्रांची योग्य माहिती देणे तसेच त्यांच्या शंकांचे निराकरण करण्याचे देखील काम या केंद्रांवरून केले जाते. मनपाचे झोन कार्यालय तसेच प्रत्येक झोनमधील प्रभागात अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. याशिवाय आंगणवाडी केंद्रांमध्ये देखील अर्ज स्वीकारले जात आहेत.
झोननिहाय जमा झालेले अर्ज
मनपाच्या दहाही झोनमध्ये आतापर्यंत एकूण २०७६१ अर्ज जमा झाले आहेत. यामध्ये १५६५५ अर्ज ऑफलाईन तर ५१०६ अर्ज आनलाईन जमा करण्यात आले. तसेच विधानसभा निहाय आंगणवाडी केंद्रांवर ४६५३६ अर्ज ऑफलाईन तर १७५८७ अर्ज ऑनलाईन असे एकूण६४१२३ अर्ज जमा झाले आहेत, अशी माहिती उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी दिली.