यावर्षी ७ महिन्यात ८४ वाघांचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:09 AM2021-07-29T04:09:24+5:302021-07-29T04:09:24+5:30
- जागतिक वाघ दिवस वसीम कुरैशी नागपूर : जगाच्या तुलनेत भारतात वाघांची संख्या ७० टक्क्यांच्या वर आहे. गेल्या ...
- जागतिक वाघ दिवस
वसीम कुरैशी
नागपूर : जगाच्या तुलनेत भारतात वाघांची संख्या ७० टक्क्यांच्या वर आहे. गेल्या काही वर्षात वाघांच्या संख्येत वाढ हाेत आहे पण अनेक कारणांनी त्यांच्या मृत्यूचे आकडेही वाढत आहेत. याच वर्षी सात महिन्यात देशात ८४ वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे व्याघ्र पर्यटनावर भर देण्यापेक्षा व्याघ्र संवर्धनाबाबत गंभीर पावले उचलणे गरजेचे झाले आहे.
वन्यजीवांच्या भ्रमणमार्गांवर अतिक्रमण, पशुधन हानीसह मानव-वाघ संघर्षाची अनेक प्रकरणे समाेर येत असतात. वाघ व हत्ती यांच्या संवर्धनासाठी यावर्षी ३०० काेटी रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे. यावरून पैशांची कमतरता नाही, हे लक्षात येते. असे असताना कमतरता कुठे आहे, हा प्रश्न विचारला जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात न करणे, हेही एक कारण असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जाते.
वन्यजीव संरक्षणामध्ये असावी आधुनिकता
२०१८ मध्ये झालेल्या गणनेनुसार देशात २९६७ वाघ आहेत. त्यावर्षी १०२ वाघांच्या मृत्यूची नाेंद झाली. यानंतर २०१९ साली ९५, २०२० मध्ये १०५ व २०२१ मध्ये ८४ वाघांचा मृत्यू झाला. म्हणजे चार वर्षात ३८६ वाघ संपले. वाघांच्या संरक्षणासाठी सरकारसह प्राधिकरणही काम करीत आहे. तरीही सकारात्मक परिणाम दिसत नाही. त्यामुळे वाघांच्या संरक्षणासाठी वर्तमान काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयाेग हाेईल तेव्हाच सकारात्मक परिणाम दिसून येतील.
- जेरिल बनाईत, वन्यजीव कार्यकर्ता