अवैध उत्खननातून ८.४४ लाख दंड वसूल
By admin | Published: March 19, 2017 03:00 AM2017-03-19T03:00:36+5:302017-03-19T03:00:36+5:30
अॅन्टी मायनिंगला आळा बसविण्याकरिता सुरू असलेल्या मोहिमेमध्ये अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या
जिल्हाधिकारी कार्यालयाची कारवाई
नागपूर : अॅन्टी मायनिंगला आळा बसविण्याकरिता सुरू असलेल्या मोहिमेमध्ये अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या ६१ लोकांकडून ८ लक्ष ४४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी शनिवारी दिली. अवैधपणे रेतीचे उत्खनन व वाहतूक तसेच दगड आदी मायनिंग संदर्भात शनिवारी प्रशासनातर्फे केलेल्या कारवाईमध्ये सर्वाधिक आठ प्रकरणे सावनेर तहसीलमध्ये नोंदविण्यात आली असून ९४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. भिवापूर तालुक्यात तीन प्रकरणात १ लाख २ हजार, पारशिवनीत १ लाख ४३ हजार ७००, उमरेड १ लाख ६७ हजार ६०० तसेच इतर जिल्ह्यातही ६१ प्रकरणांमध्ये ८ लक्ष ४४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अवैधपणे रेती व दगड वाहतूक करणाऱ्या विरुद्ध प्रभावीपणे मोहीम राबविण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)
जिल्ह्यात १ हजार ११८ प्रकरणात कारवाई
अवैधपणे उत्खनन व वाहतूक करणाऱ्याविरुद्ध १ एप्रिलपासून १ हजार ११८ प्रकरणात ४ कोटी ६९ लक्ष २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही संपूर्ण रक्कम शासन जमा करण्यात येऊन १३४ गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले.