८४९ रुग्णांनी केली कोरोनावर मात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:08 AM2021-04-24T04:08:51+5:302021-04-24T04:08:51+5:30
भिवापूर : गतवर्षी वेशीवरच रोखलेला कोरोना यावर्षी मात्र तालुक्यातील प्रत्येक गावात पोहोचल्याचे चित्र आहे. दररोज आढळणारे रुग्ण आणि मृतांची ...
भिवापूर : गतवर्षी वेशीवरच रोखलेला कोरोना यावर्षी मात्र तालुक्यातील प्रत्येक गावात पोहोचल्याचे चित्र आहे. दररोज आढळणारे रुग्ण आणि मृतांची आकडेवारी त्याहूनही सुन्न करणारी आहे. मात्र, तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा रिकव्हरी रेट दिलासा देणारा आहे. आतापर्यंत एकूण १,७६४ रुग्णांपैकी तब्बल ८४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर ८३७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर २० रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे थोडी फार लक्षणे आढळताच वेळीच तपासणी व उपचार घेतल्यास कोरोना रुग्ण १०० टक्के बरा होतो, असे मत आरोग्य क्षेत्रातील अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे. तालुक्यात सर्वाधिक रुग्ण सध्या भिवापूर शहरात असून, ही संख्या ४१० वर पोहोचली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात १,२४७ रुग्ण आहेत. तालुक्यात तपासणी व उपचार घेणाऱ्या रुग्णांची तालुक्याबाहेरील संख्या १०७ च्या घरात आहे. मृतांची एकूण संख्या ४७ असून, यात शहरातील १२, ग्रामीण ३१ व तालुक्याबाहेरील तीन रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत गंभीर असलेल्या १२ रुग्णांना नागपूर येथे रेफर करण्यात आले. यात शहरातील चार व ग्रामीणमधील आठ रुग्णांचा समावेश आहे.
तालुक्यातील रुग्णसंख्येचा अभ्यास केल्यास दररोज रुग्णांची वाढती आकडेवारी धडकी भरविणारी, तर रिकव्हर रुग्णांची संख्या ही दिलासा देणारी आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी तपासणी, उपचार व सुविधा पुरविण्यात तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिश्रम घेत आहे. यात तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, ठाणेदार महेश भोरटेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण राऊत, डॉ. शांतिदास लुंगे, मुख्याधिकारी सुवर्णा दखणे, गटविकास अधिकारी माणिक हिमाने, सहायक गटविकास अधिकारी रोशनकुमार दुबे, गणेश रवारे, विनोद डहारे, सुनील महतकर, तेजस वनकर आदी परिश्रम घेत आहेत.
ऑक्सिजनयुक्त बेडची सुविधा
फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढताच नवनिर्मित ट्राॅमा केअर युनिटच्या इमारतीत सर्वप्रथम कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. नागपूर जिल्हा ग्रामीणमध्ये बहुतांश हे पहिले कोविड केअर सेंटर आहे. त्यातही प्रत्येक बेडवर ऑक्सिजनची व्यवस्था करणारेसुद्धा जिल्ह्यातील पहिले कोविड सेंटर आहे. सद्यस्थितीत ऑक्सिजनयुक्त २० व साधे २० अशा एकूण ४० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
सुविधायुक्त, मनुष्यबळाचा अभाव
सर्व सुविधायुक्त असे पहिले कोविड केअर सेंटर निर्माण करण्याचा मान जिल्ह्यात भिवापूरला मिळाला आहे. असे असले तरी येथील आरोग्य व्यवस्थेला अपुऱ्या मनुष्यबळाचे ग्रहण मात्र कायम आहे. सतत सात दिवस २४ तास कर्तव्य बजावत असल्यामुळे कार्यरत डॉक्टर, अधिपचारिकांना त्रास होत आहे. याची दखल घेत जिल्हास्तरावरून स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील एका एमबीबीएस डॉक्टरची ड्युटी कोविड केअर सेंटरमध्ये लावण्यात आली. मात्र, एका लोकप्रतिनिधीच्या धमकी वजा आग्रहास्तव कोविड केअर सेंटरमधील ‘त्या’ डॉक्टरची ड्युटी रद्द करण्यात आली. असा प्रकार लोकप्रतिनिधींकडून होत असेल, तर कोविड सेंटरमध्ये काम कुणी का करायचे की लोकप्रतिनिधी स्वत: रुग्णांवर उपचार करणार, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
मदतीचा हात द्या
कोरोनाच्या भयावह परिस्थितीत प्रशासनाचे हात अपुरे पडत आहे. आर्थिक व्यवस्थेअभावी सुविधांची पूर्तता होत नाही. अशात प्रमोद घरडेसारखी ध्येयवेडा व्यक्ती मदतीला धावत आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनीसुद्धा निव्वळ बैठका, आदेश, फोटोसेशन करण्यापेक्षा कोविड केअर सेंटरला मदतीचा हात द्यावा, असा सूर अभिव्यक्त होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, रुग्णांची संख्या वाढत असताना, प्रशासन अपुऱ्या मनुष्यबळावर आरोग्य सुविधेचा किल्ला लढवत आहे. अशात वेगवेगळे लोकप्रतिनिधी वारंवार बैठका घेऊन अधिकाऱ्यांना सारखे उपस्थित राहण्याचा आग्रह धरत आहे. त्यामुळे कोरोनाशी लढायचे की निव्वळ बैठकीलाच जायचे, असा प्रश्नही विचारला जात आहे.