मार्च महिन्यात सोन्याच्या गुंतवणुकीवर मिळाला ८.५ टक्के परतावा
By मोरेश्वर मानापुरे | Published: March 31, 2024 10:06 PM2024-03-31T22:06:16+5:302024-03-31T22:06:20+5:30
गुंतवणूकदारांना फायदा : शुद्ध सोने जीएसटीाविना ६८,५०० रुपये
नागपूर : मार्च महिन्यात सोन्याच्या गुंतवणुकीवर ग्राहकांना तब्बल ८.५२ टक्के परतावा मिळाला. महिन्याभरात दहा ग्रॅम शुद्ध (२४ कॅरेट) सोने खरेदीवर ५,२०० रुपयांचा फायदा झाला. नागपूर सराफा बाजारात ३१ मार्चला शुद्ध सोन्याचे दर ६८,५०० रुपये तर तीन टक्के जीएसटीसह ७०,५५५ रुपयांच्या ऐतिहासिक दरावर पोहोचले. सोमवारी खुलत्या बाजारात दरवाढीची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली. शिवाय, चांदीच्या प्रति किलो दरातही ५,१०० रुपयांची वाढ होऊन भाव ७५,३०० रुपयांवर गेले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर दरदिवशी होणाऱ्या घडामोडींचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारात दिसून येत आहे. दर कमी होण्याची प्रतीक्षेत ग्राहकांनी खरेदी थांबविली. केवळ आवश्यक प्रसंगासाठीच सोने खरेदी करीत आहेत. दरवाढीसाठी अनेक कारणे सांगितली जात आहेत. पण मुख्यत्त्वे अमेरिकेत बँकांच्या व्याजदरात कपात होण्याचे संकेत असल्याने भारतात सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे नागपूर सराफा बाजार असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे यांचे मत आहे. पुढे दर कमी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. गुढीपाडव्यापर्यंत जीएसटीविना दर ७० हजारांवर जाण्याचे संकेत आहेत.
सोन्यात अशी झाली चढउतार
१ मार्च २०२४ रोजी दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे (२४ कॅरेट ९९.५ टक्के) दर ६३,३०० रुपये होते. २९ फेब्रुवारीच्या तुलनेत या दिवशी ३०० रुपयांची वाढ झाली. २ मार्चला ७०० रुपयांची वाढ झाली, तर ३ रोजी भाव पुन्हा १०० रुपयांनी वाढून ६४ हजारांवर पोहोचले. ५ मार्चला १,१०० रुपयांची घसघसीत वाढ होऊन सोने ६५,१०० रुपयांवर पोहोचले. तर ६ मार्चला २०० रुपयांनी घसरले. ७ मार्चला ५०० रुपयांची वाढ झाली. ११ आणि १२ रोजी भाव स्थिर होते. २० मार्चपर्यंत चढउतार होऊन भाव ६६ हजारांवर पोहोचले. २१ मार्चला तब्बल १,२०० रुपयांची वाढ होऊन भावपातळी ६७,२०० रुपयांवर गेली. २३ मार्चपर्यंत भाव ६६,४०० रुपयांपर्यंत कमी झाले. २६ मार्चनंतर पुन्हा दरवाढ झाली. २७ रोजी ६७ हजार, २८ रोजी ६७,५०० रुपये तर २९ आणि ३० मार्च रोजी सोन्याचे भाव ६८,५०० रुपयांवर स्थिर होते.
सोने दराचा तक्ता :
दिनांक सोने दर
१ मार्च ६३,२००
२ मार्च ६३,९००
४ मार्च ६४,०००
५ मार्च ६५,१००
६ मार्च ६४,९००
७ मार्च ६५,४००
९ मार्च ६५,९००
१५ मार्च ६५,८००
१८ मार्च ६५,५००
२० मार्च ६६,०००
२१ मार्च ६७,२००
२३ मार्च ६६,४००
२६ मार्च ६६,९००
२७ मार्च ६७,०००
२८ मार्च ६७,५००
३० मार्च ६८,५००
(३ टक्के जीएसटी वेगळा)