नागपूर जिल्ह्यात विविध आजाराचे ८५ हजार रुग्ण : ‘माझे कुटुंब़,माझी जबाबदारी’चा दुसरा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 07:57 PM2020-11-10T19:57:01+5:302020-11-10T19:58:58+5:30
Second phase of 'My family, my responsibility', Nagpur newsजिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्व्हेचा दुसरा टप्पा नुकताच पार पडला. त्यात जिल्ह्यातील २३ लाख १७ हजार ३४ लोकसंख्येपैकी २१ लाख ८८ हजार ९४७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात ८५ हजार ४६४ विविध आजाराचे रुग्ण आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्व्हेचा दुसरा टप्पा नुकताच पार पडला. त्यात जिल्ह्यातील २३ लाख १७ हजार ३४ लोकसंख्येपैकी २१ लाख ८८ हजार ९४७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात ८५ हजार ४६४ विविध आजाराचे रुग्ण आढळून आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गत १५ सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ जनजागृती अभियान सुरू केले होते. या अभियानात आशा स्वयंसेविका, वैद्यकीय सहाय्यक, गट प्रवर्तक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, सर्व ग्रामपंचायतींनी परिश्रम घेतले. जिल्ह्यातील ५ लाख १८ हजार ३२९ घरांपैकी ५ लाख ९ हजार १२१ घेरी भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी जिल्ह्यातील शहरीभागात १५३ आरोग्य पथके, ग्रामीण भागात १ हजार ८४१ पथके नेमण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्यात अभियानाचा पहिला टप्पा पूर्ण झाला. तर दुसऱ्या टप्प्यात ९४.४७ टक्के तपासणी झाल्या. त्यात १०४८ संशयितांपैकी २०२ कोरोनाबाधित आढळून आले.
विविध आजाराच्या रुग्णांची संख्या
मधुमेह - ३२,८००
उच्च रक्तदाब - ४,२३६
किडनी - ४८८
इतर आजार - ४७,४८२
पोस्ट कोविडवर उपचार
जिल्ह्यात पोस्ट कोविडलाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नियमित ओपीडी संपल्यानंतर दुपारी १२ ते २ दरम्यान पोस्ट कोविड ओपीडी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू केली आहे.
पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणात सारी, आयएलआयचे १ हजार ४१२ संशयित आढळून आले होते. त्याप्रसंगी खबरदारी म्हणून २ हजार ३३५ नागरिकांची कोरोना चाचणी केली असता १ हजार ०९८ रुग्ण बाधित आढळले होते. या बाधितांचा वेळीच उपचार करण्यात आल्याने कोरोना शृंखला तोडण्यास व मृत्यूदर कमी करण्यास मदत मिळाली. डिसेंबरमध्ये कोरोनाची संभाव्य लाट येण्याचा धोका वर्तविण्यात येत असल्याने जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्क आहे.
मनोहर कुंभारे, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती (जि.प.)