नागपुरात ८५.८३ लाखांची विषारी सुपारी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 10:16 AM2019-01-25T10:16:49+5:302019-01-25T10:24:45+5:30
कर्नाटक आणि दिल्ली येथे नागपुरातून पाठविण्यात येणारी ८५.८३ लाख रुपये किमतीची ४९,९२४ किलो विषारी सुपारी गुरुवारी अन्न व प्रशासन विभागाने जप्त केली. या कारवाईने सुपारी व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : न्यायालयाच्या आदेशाकडे कानाडोळा करून विषारी सुपारीची तस्करी धडाक्यात सुरू असल्याची घटना गुरुवारी उजेडात आली आहे. कर्नाटक आणि दिल्ली येथे नागपुरातून पाठविण्यात येणारी ८५.८३ लाख रुपये किमतीची ४९,९२४ किलो विषारी सुपारी गुरुवारी अन्न व प्रशासन विभागाने जप्त केली. या कारवाईने सुपारी व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
मानकापूर आणि जरीपटका पोलिसांनी माहितीच्या आधारे विषारी सुपारीची वाहतूक करणारे दोन ट्रक बुधवारी रात्री ताब्यात घेतले. याची माहिती पोलिसांनी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी दुपारी ४ वाजता दिली. अधिकाऱ्यांनी ट्रकमधील सुपारीची तपासणी करून नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविले आणि ट्रक जप्त करून वाहतूकदारांकडे ठेवले. अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे. सोमवारी कर्नाटक राज्यात ट्रकद्वारे पाठविण्यात येणारी ४५ लाख रुपये किमतीची विषारी सुपारी बेलतरोडी पोलिसांनी ताब्यात घेतली होती. एफडीएने ट्रक जप्त केला होता.
भंडारा रोड, ट्रान्सपोर्टनगर येथील मंजूनाथ रोड लाईन्सच्या एमएच ४९ एटी ३५८२ क्रमांकाच्या ट्रकने सुपारी कर्नाटक येथे पाठविण्यात येत असल्याच्या माहितीच्या आधारे जरीपटका पोलिसांनी कारवाई केली. या ट्रकमध्ये ४६.२१ लाख रुपये किमतीची २४,८४८ किलो सुपारी होती.
ही सुपारी नागराज नारायण नाईक यांची आहे. याशिवाय मानकापूर पोलिसांनी ३९.६२ लाख रुपये किमतीची २५,०७८ किलो सुपारी ट्रकसह ताब्यात घेतली. ही सुपारी भंडारा रोड वर्धमाननगर, हल्दीराम फॅक्टरीजवळील ओम ट्रेडर्सचे जसबीरसिंग चटवाल यांची होती. हा ट्रक ट्रान्सपोर्टनगर येथील मौराणीपुरा लॉजिस्टिक प्रा.लि.च्या माध्यमातून दिल्ली येथील दोन व्यापाऱ्यांना पाठविण्यात येत होता.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्या नेतृत्वात आणि सहायक आयुक्त (अन्न) मिलिंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मानकापूर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा अधिकारी अमित उपलप व आनंद महाजन आणि जरीपटका ठाण्यात अन्न सुरक्षा अधिकारी विनोद धवड व प्रफुल्ल टोपले यांनी कारवाई केली.
इंडोनेशियातून होते आयात
विक्री आणि साठवणुकीवर प्रतिबंध असलेली कोट्यवधी रुपयांची विषारी सुपारी नागपुरातून दुसऱ्या राज्यात पाठविण्यात येते. या व्यवसायासाठी नागपूर मोठी बाजारपेठ आहे. सुपारीला करचोरी करून इंडोनेशियातून आयात करण्यात येते. विषारी सुपारीच्या सेवनाने लोकांना कॅन्सरसारखा गंभीर आजार होत आहे. याची गंभीर दखल घेत यापूर्वी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.