नागपूर-गोवा महामार्गासाठी ८६ हजार कोटींचा खर्च; ‘ड्रीम प्रोजेक्ट’ची लांबी ७६० किमी
By योगेश पांडे | Published: December 29, 2022 05:49 AM2022-12-29T05:49:47+5:302022-12-29T05:50:32+5:30
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गानंतर राज्यात आणखी एका मोठ्या महामार्गाच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे.
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गानंतर राज्यात आणखी एका मोठ्या महामार्गाच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. याच धर्तीवर नागपूर ते गोवा एक्स्प्रेस वे बनविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. या मार्गामुळे नागपूर ते गोवादरम्यानचे अंतर फार कमी होणार आहे. या महामार्गासाठी ८६ हजार कोटींहून अधिकचा खर्च लागण्याची शक्यता आहे.
समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाच्या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते गोवादरम्यानच्या महामार्गाबाबत भाष्य केले होते. त्याअगोदर त्यांनी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिलच्या विदर्भ चॅप्टरच्या वतीने आयोजित कार्यक्रमातदेखील ही बाब जाहीर केली होती. या महामार्गामुळे भविष्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र ते थेट गोवा, असा प्रवास आणखी जलद आणि सुखकर होणार आहे, असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
राज्यातील १२ जिल्ह्यांना जोडणार
वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग नंतर पुढे महाराष्ट्र-गोवा सीमेवर कोकण द्रुतगती मार्गाला जोडणार.
सुरुवात कधी?
- हा मार्गाचे काम नेमके कधी सुरू होणार, याबाबत विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. मात्र, शिंदे-फडणवीसांच्या यापुढील ‘ड्रीम प्रोजेक्ट’साठी प्रशासकीय पातळीवरदेखील पावले उचलण्यात येत आहेत.
- अनिकेत तटकरे यांनी या मुद्द्यावर तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत यासंदर्भात उपस्थित प्रश्नाला लेखी उत्तर दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"