८६ कि.मी. क्षेत्रातली ४० हजारावर झाडे जगवली; वनपालांची दक्ष देखरेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 11:52 AM2018-04-02T11:52:42+5:302018-04-02T11:52:52+5:30
अभय लांजेवार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: आपण लावलेली इवली इवली रोपटी मेली की जगली. एखाद्याने मुद्दाम खोडसाळपणा करीत रोपट्याला उपटून फेकून तर दिले नाही ना. अशा एक ना अनेक बाबी मनात घर करायच्या. मग पहाटेच ४ वाजता हातात टॉर्च घेत ‘आॅन दि स्पॉट’ पाहणी करायची. सातत्याने पाच वर्षे जिद्दीने, इमानेइतबारे काम केले. घरावर तुळशीपत्र ठेवत सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत काम. जेवणाचा पत्ता नाही. कधीकाळी पगारामधील पैसाही वृक्षवल्लींना जगविण्यात लावला. रोपट्यांना जगविण्यासाठी टँकरनेही पाणीपुरवठा केला. खडकाळ, मुरमाळ जमिनीवरही रोपटी लावली. केवळ लावली नाही तर १०० टक्के जगविलीदेखील! वृक्षवल्लींच्या दुनियेतील या अनोख्या ताऱ्याचे नाव माधव नारायण वैद्य आहे. नुकताच त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त केला.
सामाजिक वनीकरण विभागात वनपाल म्हणून ते कर्तव्यावर होते. कर्तव्यावर असताना रोपटी जगविणाऱ्या या वल्लीला सेवानिवृत्तीनंतर ‘वन विस्तार’ या विभागांतर्गत सुवर्णपदक मिळाले. गोंदिया, वर्धा, भंडारा आणि नागपूर या चार जिल्ह्यातील नागपूर वनवृत्तामधून ते या पुरस्काराचे एकमेव मानकरी ठरले.
विशेषत: तब्बल ८६ किलोमीटर क्षेत्रात ४० हजारांपेक्षाही अधिक झाडे वैद्य यांनी जगविली. त्यांच्या या उपक्रमशीलतेमुळे परिसरातील वृक्षारोपण राज्यासाठी ‘रोल मॉडेल’ ठरले होते. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश येथूनही वन विभागाचे बडे अधिकारी वृक्षारोपण बघण्यासाठी येत असत. उमरेड परिसरातील अनेक मार्गावर दुतर्फा भागावर बहरलेली वृक्ष नजरेस पडली की यापैकी बहुतांश कामे वैद्य यांच्याच पुढाकारातून साकारलेली आहेत, हे येथे उल्लेखनीय.
सामाजिक वन विभागात कर्तव्यावर असताना त्यांच्या कामाचे केवळ तोंडभरून कौतुक झाले. पुरस्काराची थाप मात्र कधी पडली नाही. यावर ते म्हणतात, पुरस्काराच्या मागे मी कधी धावलो नाही आणि आपल्या कामाचा आपणच गवगवाही कधी केला नाही. माझे गाव मला सुंदर करायचे होते. ते काम मी प्रामाणिकपणे केल्याचा अभिमान मला वाटतो. आजही अनेक मार्गावर प्रवासादरम्यान मी लावलेली वृक्ष मोठी झालेली दिसतात, तेव्हा आनंदाला पारावर राहात नाही, अशीही बाब वैद्य यांनी व्यक्त केली.
निसर्ग सौंदर्य
उमरेड गावसूत ते कुही, तेलकवडसी ते जुनोनी, गांगापूर ते लोहारा फाटा, लोहारा फाटा ते मकरधोकडा, मकरधोकडा-बुटीबोरी, तीरखुरा ते कºहांडला, लोहारा ते म्हसाळा (रिठी) आदी रस्ते त्यांच्या पुढाकारातून हिरवेगार झाल्याने हा परिसर निसर्ग सौंदर्याने अधिकच बहरलेला दिसतो. त्यांच्या संपूर्ण कार्यात सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी किशोर मिश्रीकोटकर यांनी भरपूर सहकार्य केले. शिवाय पत्नी मंदा यांचाही वाटा मोलाचाच!
संधीच सोनं केलं
प्रारंभी सन १९८२ पासून माधव वैद्य हे वन विभागात कर्तव्यावर होते. सन २०१७ ला सेवानिवृत्त झाले. दरम्यान, सन २०१३ पासून उमरेडमध्येच सामाजिक वनीकरण विभागात काम करण्याची संधी मिळाली. आपला परिसर हिरवागार झाला पाहिजे, असा विचार मनात आला. मी काम केले. मेहनत घेतली. प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडली. माझे काम बोलू लागले. आपल्या गावात आपण काम करणार नाही तर कोण करणार. गावातच काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद होता. सेवानिवृत्तीचा काळही जवळच आला होता. या कार्यकाळातच त्यांनी हा चमत्कार घडवून आणला. असंख्य रस्ते हिरवेगार केले. मिळालेल्या संधीचं सोनं केलं.