मास्क न घालणाऱ्या ८७८ रेल्वे प्रवाशांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:08 AM2021-04-27T04:08:13+5:302021-04-27T04:08:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मध्य रेल्वे प्रशासनाने मास्क न घालणाऱ्या ८७८ प्रवाशांना दंड ठोठावून एकूण १ लाख ७० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य रेल्वे प्रशासनाने मास्क न घालणाऱ्या ८७८ प्रवाशांना दंड ठोठावून एकूण १ लाख ७० हजार ४५० रुपये वसूल केले आहेत. ही कारवाई दिनांक १७ ते २५ एप्रिल या कालावधीत नागपूर, मुंबई, सोलापूर, पुणे व भुसावळ या पाच मंडळांच्या हद्दीत करण्यात आली.
राज्यात कोरोना संक्रमण झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. मात्र, असे असले तरी काही नागरिकांनी अद्यापही धडा घेतलेला नाही. ते कोरोना नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढत आहे. ही बाब लक्षात घेत मध्य रेल्वे प्रशासनाने कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत ८७८ प्रवाशांना दणका देण्यात आला आहे. नागपूर मंडळामध्ये २६७ प्रवाशांकडून ६२ हजार ७५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मास्क न घालणाऱ्या प्रवाशांना ५०० रुपये दंड ठोठावला जात आहे. प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करून स्वत:सह इतर प्रवाशांचेही कोरोनापासून संरक्षण करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. ‘लोकमत’ने काही दिवसांपूर्वी बातमी प्रकाशित करून रेल्वे प्रवासी नियम पाळत नाहीत, याकडे लक्ष वेधले होते.