शिष्यवृत्ती परीक्षेला ८८ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:11 AM2021-08-13T04:11:53+5:302021-08-13T04:11:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती कायम असल्याने विद्यार्थी कमी संख्येत राहतील असा अंदाज होता. प्रत्यक्षात ८८ टक्के विद्यार्थ्यानी परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा दिली. काही ठिकाणी विद्यार्थी मास्कविना होते, त्यामुळे काही जणांनी आक्षेप घेतला होता. दरम्यान, शाळा बंदच असताना ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचा आग्रह का होता, असा सवाल पालकांनी उपस्थित केला.
नागपूर जिल्ह्यातील १८ हजार २८२ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील ५० टक्के विद्यार्थीच उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात १६ हजार ६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ही टक्केवारी ८७.८६ टक्के इतकी होती. पाचवीचे ११ हजार ७६ पैकी ९ हजार ७०० विद्यार्थी उपस्थित होते. तर आठवीच्या ७ हजार २०६ पैकी ६ हजार ३६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार परीक्षा शांततेत पार पडली. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही परीक्षा केंद्रांवर काही विद्यार्थी विना मास्क असल्याने पालकांनी आक्षेप घेतला.
परीक्षा केंद्रांची संख्या वाढविली
कोरोनामुळे फिजिकल डिस्टन्सिंग राखणे अनिवार्य होते. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्यात आली होती. पाचवीसाठी जिल्ह्यात ९९ तर आठवीसाठी ७४ केंद्र होते.
पालकांची संतप्त प्रतिक्रिया
शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत राज्य शासनामध्येच संभ्रम आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. अशा स्थितीत शिष्यवृत्ती परीक्षा ऑफलाईन घ्यायचा आग्रह का होता, असा सवाल पालकांनी केला. शाळेत गेल्याने कोरोना होतो व शिष्यवृत्ती परीक्षा दिल्याने होत नाही, असे काही संशोधन आहे का अशी उपरोधात्मक प्रतिक्रियादेखील काही पालकांनी दिली. बहुतांश पालक पूर्णवेळ परीक्षा केंद्रांबाहेर उभे होते.