सहा वर्षांत ८८ पोलीस शहीद
By Admin | Published: July 31, 2014 01:03 AM2014-07-31T01:03:35+5:302014-07-31T01:03:35+5:30
विदर्भात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांमध्ये ८८ पोलीस जवान शहीद झाले तर १३९ निरपराध्यांचा नाहक बळी गेला. पडोळे ले-आऊट येथील सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या
नक्षली हल्ल्यांचा लेखाजोखा : १३९ निरपराध नागरिकांचाही बळी
नागपूर : विदर्भात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांमध्ये ८८ पोलीस जवान शहीद झाले तर १३९ निरपराध्यांचा नाहक बळी गेला. पडोळे ले-आऊट येथील सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात प्राप्त केलेली ही माहिती आहे. नक्षली हल्ल्यांचा हा लेखाजोखा १ मे २००९ पासून ३१ मे २०१४ पर्यंतचा आहे.
सर्वाधिक ३४ जवान शहीद
२००९ मध्ये ३७ चकमकी होऊन २ नक्षलवादी मारल्या गेले होते तर सर्वाधिक ३४ पोलीस जवान शहीद झाले होते. १९ नागरिक ठार झाले होते. शहीद पोलीस जवानांच्या कुटुंबीयांना शासनाने २७ कोटी ७ लाख ८० हजाराची आर्थिक मदत दिली होती तर सामान्य नागरिकांच्या कुटुंबीयांना ७२ लाखांची मदत देण्यात आली होती. याच काळात पाच नक्षलवादी पोलिसांना शरण आले होते. त्यांच्या पुनर्वसनासाठी १० लाख ७५ हजाराची मदत देण्यात आली होती.
२०१० मध्ये १६ चकमकी होऊन २ नक्षलवादी ठार झाले होते तर १० पोलीस जवान शहीद झाले होते. हल्ल्यात ३२ सामान्य नागरिकांचाही बळी गेला होता. शासनाने शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना ३ कोटी ८१ लाख २५ हजाराची आर्थिक मदत केली होती. मृत सामान्य नागरिकांच्या कुटुंबीयांना १ कोटी १६ लाख एवढी मदत करण्यात आली होती. याच काळात २१ नक्षलवादी शरण येऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी २१ लाख ५० हजाराची मदत करण्यात आली होती.
एका शहीद जवानासाठी ४४ लाख
एकूण सहा वर्षांत १६९ चकमकी होऊन ५३ नक्षलवादी ठार झाले आणि ८८ पोलीस जवान शहीद झाले.
१३९ सामान्य नागरिकांचा बळी गेला. शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना ३८ कोटी ९१ लाख ६८ हजाराची मदत करण्यात आली.
ही सरासरी मदत प्रत्येक शहीद जवानांसाठी ४४ लाख रुपये एवढी आहे. मृत सामान्य नागरिकांच्या कुटुंबीयांना ३ कोटी ९२ लाखांची मदत करण्यात आली आहे. ही सरासरी मदत प्रत्येक मृत नागरिकासाठी २ लाख ८२ हजार आहे.(प्रतिनिधी)