८८४ रुग्णांची जबाबदारी केवळ ६० कर्मचाऱ्यांवर; नागपुरातील मेयोमधले वास्तव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 08:40 AM2021-09-17T08:40:00+5:302021-09-17T08:40:02+5:30
Nagpur News ८८४ बेड असलेल्या या रुग्णालयाची जबाबदारी केवळ ६० कर्मचाऱ्यांवर आल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग लागून, परिसरात दुर्गंधी पसरल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वच्छ वातावरण असले की, पन्नास टक्के संसर्ग आजार दूर ठेवता येतात; परंतु मेयोमध्ये याच्या उलट चित्र आहे. ८८४ बेड असलेल्या या रुग्णालयाची जबाबदारी केवळ ६० कर्मचाऱ्यांवर आल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग लागून, परिसरात दुर्गंधी पसरल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.
(884 patients are the responsibility of only 60 staff; Reality from Mayo in Nagpur)
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (मेयो) सतत गर्दी, रांगा नेहमीचा भाग असलातरी, येथे येणाऱ्यांसाठी मूलभूत सोयी उपलब्ध नाहीत. स्वच्छतागृहातील स्वच्छता नावालाही नाही. सुरू असलेल्या युरिनलसह शौचालयाची स्थिती भयंकर आहे. तिकडे पाहू शकणार नाही, इतकी घाण त्या ठिकाणी आहे. इमारतीलगत तर कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. वॉर्डाच्या आत, बाहेर आणि पायऱ्यांवर जैविक कचऱ्यासह खरखटे अन्न व इतर कचरा नेहमीच पडलेला असतो. वॉडार्तील वऱ्हांड्यात ठेवलेल्या कचरापेटीची सफाई योग्य होत नसल्याने नाकाला रुमाल बांधूनच समोर जावे लागते. स्त्रीरोग व प्रसूतीच्या इमारतीत जागोजागी जैविक कचरा पडून राहत असल्याने रुग्णांसोबतच डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
-५९४ बेडनुसारच चतुर्थ कर्मचारी
मेयो रुग्णालयात पूर्वी बेडची संख्या ५९४ होती. नंतर सर्जिकल कॉम्प्लेक्स उभे झाल्याने ३९० बेडची भर पडली. सध्या एकूण ८८४ बेड आहेत. परंतु आजही ५९४ बेडनुसार कर्मचाऱ्यांना मंजुरी आहे. यातही १२७ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. दरम्यानच्या काळात एका याचिकेवर न्यायालयाने सर्जिकल कॉम्प्लेक्ससाठी १५७ चतुर्थ कर्मचारी देण्याचे आदेश दिले होते. परंतु या कर्मचाऱ्यांची अद्याप भरतीही झाली नाही. सध्या ६० कर्मचाऱ्यांवर ८८४ बेडच्या रुग्णालयांच्या सफाईची जबाबदारी आहे. यामुळे अस्वच्छतेचा कळस गाठला आहे.
-एका पाळीत केवळ २० कर्मचारी
कोरोनाकाळात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मेयोला १६५ चतुर्थश्रेणी कर्मचारी मिळाले होते. यामुळे सफाईचा प्रश्न पुढे आला नव्हता. कोरोनाचे रुग्ण कमी होताच जुलै महिन्यात या सर्व कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे निर्देश होते. परंतु मेयो प्रशासनाच्या विनंतीवरून ३१ ऑगस्टपर्यंत यांची मुदत वाढविण्यात आली. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून सफाई कर्मचारी न मिळाल्याने मेयो प्रशासनाने नुकतेच यातील १०५ कर्मचाऱ्यांना काढून ६० कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले आहे. एका पाळीत केवळ २० कर्मचारी काम करीत आहेत.
-आउटसोर्सिंगसाठी लागणार दीड महिना
मेयो प्रशासनाने स्वच्छतेच्या कामाचे आउटसोर्सिंगला मंजुरी देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता. सुरुवातीला विभागाने तो नाकारला; परंतु आता त्याला परवानगी दिली आहे. मात्र, यासाठी निविदा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. निविदा काढून पूर्णप्रक्रिया होण्यास जवळपास एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत साफसफाईचे काय, हा प्रश्न आहे.