९७ ग्रामपंचायतींना मिळणार हक्काचे कार्यालय
By admin | Published: August 31, 2015 02:48 AM2015-08-31T02:48:15+5:302015-08-31T02:48:15+5:30
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९७ ग्रामपंचायतींना जनसुविधा विशेष अनुदानातून ग्रामपंचायत कार्यालय ..
नागपूर : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९७ ग्रामपंचायतींना जनसुविधा विशेष अनुदानातून ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी ९ कोटी ७० लाख तर १३२ गावांतील स्मशानभूमीसाठी १० कोटी ५३ लाख असा एकूण २० कोटींचा निधी प्राप्त होेणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींना लवकरच हक्काचे कार्यालय मिळणार आहे.
जिल्ह्यात ७६९ ग्रामपंचायती आहेत. यातील ५३७ ग्रामपंचायतींचा कारभार स्वत:च्या मालकीच्या कार्यालयातून चालतो; उर्वरित ३३२ ग्रामपंचायतींची कार्यालये भाड्याच्या जागेत आहेत. यातील ९७ ग्रामपंचायतींना २०१५-१६ या वर्षात बांधकामासाठी निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी गुरुवारी दिली.
जिल्हा नियोजन समितीकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
शुक्रवारच्या बैठकीत याला मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे; तसेच २०१६-१७ या वर्षात ९७ ग्रामपंचायत कार्यालयांचे बांधकाम प्रस्तावित आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना स्वत:च्या मालकीचे कार्यालय असावे, असा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)