९७१ आजारांसाठी वैद्यकीय कवच
By admin | Published: February 23, 2017 02:11 AM2017-02-23T02:11:13+5:302017-02-23T02:11:13+5:30
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसोबत एक लक्ष रुपयांपर्यंत उत्पन्न
राजीव गांधी जीवनदायी योजना : आरोग्य मित्र देतील सुविधा
नागपूर : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसोबत एक लक्ष रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबांना थेट मदत मिळणार आहे. या योजनेत ९७१ आजारांसाठी वैद्यकीय मदत मिळणार आहे. रुग्णालयाच्या माध्यमातून थेट रुग्णांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी आरोग्य मित्र मदत करणार आहे. रुग्णांपर्यंत सेवा पोहोचविताना काही अडचण निर्माण झाल्यास टोल फ्री वर तक्रार करण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा पहिला टप्पा २ जुलै २०१२ पासून गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर या आठ जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आला आहे.
योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांला मिळावा या उद्देशाने २१ नोव्हेंबर २०१३ पासून संपूर्ण राज्यात ही योजना लागू करण्यात आली आहे. दारिद्र्यरेषेखालील पिवळी, अन्नपूर्णा, अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक कुटुंबे आणि दारिद्र्यरेषेवरील एक लक्ष रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेली केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक अशा कुटुंबीयांना विमा संरक्षणाद्वारे ९७१ आजारांवर वैद्यकीय सेवा पुरविण्यात येईल.
या योजनेसंदर्भात माहितीसाठी येणाऱ्या तक्रार निवारण्याकरिता थेट १५५३८८/ १८०० २३३ २२०० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली आहे.(प्रतिनिधी)