नागपूर रेल्वे स्थानकात सापडली ९८ जिवंत काडतुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:34 PM2019-03-18T23:34:33+5:302019-03-18T23:35:40+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वेस्थानकावर ९० जिवंत काडतुसे सापडल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजता प्लॅटफार्म क्रमांक ७ च्या मेन्टेनन्स विभागात उघडकीस आली. यामुळे ही जिवंत काडतुसे कुणाची आहेत, कुणी येथे आणली, हे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वेस्थानकावर ९० जिवंत काडतुसे सापडल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजता प्लॅटफार्म क्रमांक ७ च्या मेन्टेनन्स विभागात उघडकीस आली. यामुळे ही जिवंत काडतुसे कुणाची आहेत, कुणी येथे आणली, हे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ७ च्या शेजारी मेन्टेनन्स विभाग आहे. या कार्यालयाच्या मागे हेल्परला बसण्यासाठी एक बैठक कक्ष आहे. येथे कार्यालयाची कागदपत्रे राहतात. नेहमीच्या पद्धतीने कंत्राटी कर्मचारी लीलाधर राऊत (३७) रा. मानकापूर या खोलीची सफाई करीत होता. आलमारीच्या खाली झाडू मारताना त्यास ही जिवंत काडतुसे मिळाली. याची सूचना राऊत याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. लागलीच रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. वरिष्ठ विभाग अभियंता धनंजय काणे हे लोहमार्ग पोलिसात पोहोचले. माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, लोहमार्ग पोलीस सहायक पोलीस निरीक्षक मुबारक शेख, उपनिरीक्षक रवी वाघ, आरपीएफचे उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, हेड कॉन्स्टेबल गजानन शेळके, रोशन मगरे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून काडतुसे ताब्यात घेतली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
कडक सुरक्षा असूनही काडतुसे आली कशी?
मागील काही दिवसांपूर्वी पुलवामात आतंकवादी हल्ला झाल्यानंतर नागपूरसह देशभरात खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आता लोकसभा निवडणुकीमुळे रेल्वेस्थानकावर कसून तपासणी सुरू आहे. नागपूर रेल्वेस्थानक संवेदनशील समजल्या जाणाऱ्या रेल्वेस्थानकांच्या यादीत आहे. रेल्वेस्थानकावर कडेकोट बंदोबस्त असून सर्व अवैध प्रवेशद्वारे बंद करण्यात आली आहेत. तरीसुद्धा तीन खर्ड्याच्या बॉक्समध्ये ९ एमएमची ९८ काडतुसे आढळल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.