९७ लाखांच्या बाद नोटा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 01:22 AM2017-08-02T01:22:16+5:302017-08-02T01:23:31+5:30
चलनातून बाद झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बँक अधिकाºयांच्या माध्यमातून बदलवून देण्याचा गोरखधंदा सुरूच असल्याची खळबळजनक माहिती मंगळवारी उघड झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चलनातून बाद झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बँक अधिकाºयांच्या माध्यमातून बदलवून देण्याचा गोरखधंदा सुरूच असल्याची खळबळजनक माहिती मंगळवारी उघड झाली. गुन्हे शाखेच्या पथकाने वॉक्स कूलर जवळच्या एका सदनिकेत छापा घालून एका बिल्डरला अटक केली. त्याच्याकडून बाद झालेल्या ९७ लाख ५० हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. कोट्यवधींची रोकड घेऊन त्याचे पाच ते सात साथीदार मात्र पळून गेले. या कारवाईमुळे उपराजधानीत खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव प्रसन्ना मनोहर पारधी (वय ४४) असून, रामदासपेठेतील सेंट्रल मॉलजवळ त्याचे निवासस्थान आहे.
वॉक्स कूलर चौकाजवळच्या राणा अपार्टमेंटमध्ये काही इसम कोट्यवधींची रोकड घेऊन ‘हेरफेर’ करणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन लुले, उपनिरीक्षक दत्ता पेंडकर, हवालदार बट्टूलाल पांडे,
नायक महेश कुरसंगे, बलजित ठाकूर, सय्यद वाहिद आणि विजय लेकुरवाळे यांचे पथक राणा अपार्टमेंटमध्ये पोहोचले. तिसºया माळ्यावर ३०१ क्रमांकाच्या सदनिकेत पोलिसांना बिल्डर प्रसन्ना पारधी आढळले. एका रुममध्ये स्पोर्ट बॅग पडून होत्या. त्यात चलनातून बाद झालेल्या ५०० आणि १००० रुपयांचे बंडल खच्चून भरले होते. पोलिसांनी पारधी यांची चौकशी केली असता, त्यांनी या नोटा आपण कुमार छुगानी (रा. खरे टाऊन) याच्या सांगण्यावरून आणल्या. तो त्याच्या बँक अधिकारी असलेल्या मित्रांच्या माध्यमातून या नोटा बदलवून देणार होता, असे पारधीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी पारधीला ताब्यात घेऊन त्या नोटा जप्त केल्या आणि गुन्हे शाखेत आणले.
एक्सचेंज आॅफर २५ टक्क्यांची!
छुगानी याचे सदरच्या श्रीराम टॉवरमध्ये मोठे कापड शोरूम आहे. त्याची अनेक बँक अधिकाºयांशी मैत्री असून, त्यामुळे तो आणि त्याचे साथीदार या बाद झालेल्या नोटा चालवून घेण्याचा छातीठोक दावा करीत असल्याचेही सांगितले जाते. पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्याची रक्कम (बाद झालेल्या नोटा) आहे, त्यांना २५ टक्के नवे चलन दिले जाणार होते, तर ७५ टक्के रक्कम छुगानी आणि त्याचे साथीदार वाटून घेण्याचे ठरले होते. विशेष म्हणजे, अकोला पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बाद झालेल्या लाखोंच्या जुन्या नोटा जप्त केल्या. या नोटा सदरमधील गुड्डू ऊर्फ इमरानने राजूच्या मदतीने दिल्या होत्या, अशी चर्चा आहे.
स्थानिक व्यापारी आणि वर्धेतील डॉक्टर पळाला
पोलिसांनी चौकशी केली असता, आपल्यासोबत आणखी काही व्यापारी आणि वर्धेतील एक डॉक्टर अशाच प्रकारे दोन ते तीन कोटी रुपयांची रोकड घेऊन आले होते, असे पारधीने पोलिसांना सांगितले. दरम्यान, जुन्या नोटा बदलवून घेण्याच्या प्रयत्नातील बिल्डर पारधीला पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त सर्वत्र वायुवेगाने पसरले. त्यामुळे या नोटा बदलवून घेण्याच्या गोरखधंद्यात सहभागी असलेल्यांचे धाबे दणाणले. अनेक जणांनी रातोरातच नागपुरातून पलायन केले. विशेष म्हणजे, पोलिसांनी या अपार्टमेंटमध्ये धडक देताच खाली जमलेले पाच ते सात जण पळून गेले. काही वेळेनंतर पोलीस पोहोचले असते तर हे सर्व ३०१ क्रमांकाच्या सदनिकेतच पोलिसांच्या हाती लागले असते.