नऊ जणांवर भ्रष्टाचाराचा ठपका

By admin | Published: December 27, 2015 03:34 AM2015-12-27T03:34:18+5:302015-12-27T03:34:18+5:30

दक्षिण उमरेड परिक्षेत्रातील तालुक्यातील चनोडा येथील रोपवनात लाखो रुपयांचा चुना लावल्याप्रकरणी अखेरीस बेला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

9 people accused of corruption | नऊ जणांवर भ्रष्टाचाराचा ठपका

नऊ जणांवर भ्रष्टाचाराचा ठपका

Next

गुन्हा दाखल : चनोडा रोपवन अफरातफर प्रकरण
उमरेड : दक्षिण उमरेड परिक्षेत्रातील तालुक्यातील चनोडा येथील रोपवनात लाखो रुपयांचा चुना लावल्याप्रकरणी अखेरीस बेला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नऊ जणांवर ४३ लाख ६० हजार ८४३ रुपयांच्या अफरातफरीचा ठपका ठेवण्यात आला असून, यामुळे वनविभागासह संपूर्ण शासकीय यंत्रणा हादरली आहे.
मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने विभागीय वन अधिकारी (दक्षता विभाग) केवलदास फागोजी डोंगरे यांनी फिर्याद नोंदविली. उपवनसंरक्षक डी.एम. भट, सहायक वनसंरक्षक आर.बी. खराबे, वन परिक्षेत्र अधिकारी एस.बी. गोसावी, नांदरा येथील क्षेत्रसहायक पी.एम. खोरगडे, बोटेझरी येथील क्षेत्र सहायक एन.एस. वाडीघरे, वनरक्षक एम.आर. मुंडे (नांदरा), पी.बी. दहीकर (सुकळी), संदीप पेंदाम (बोटेझरी) आणि संयुक्त व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील दहागने या नऊ जणांवर सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाच्या कार्यकाळात निलंबनाच्या कारवाईनंतर एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
लोकसेवकांनी कट रचून शासकीय रकमेची अफरातफर करणे असे या गुन्ह्याचे स्वरूप असून, भादंवि ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२० ब कलमान्वये बेला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार अशोक देवतळे करीत आहेत. लोकमतने सलग चनोडा रोपवन प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचारावर प्रकाश टाकला. अफरातफरीची पाळेमुळे उकरून काढली. या प्रकरणी बरेच चर्वितचर्वण झाल्यानंतर अखेरीस गुन्हा दाखल झाल्याने गावकऱ्यांनी भ्रष्टाचारविरुद्ध पुकारलेल्या या लढ्याला आता अंशत: यश मिळाल्याच्या प्रतिक्रिया विलास झोडापे यांनी व्यक्त केल्या. या नऊ आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणीही त्यांनी रेटून धरली. (प्रतिनिधी)

असे आहे प्रकरण
उमरेड तालुक्यातील चनोडा येथील कक्ष क्रमांक ३६४ मधील १७२ हेक्टर परिक्षेत्रात वनविभागाच्यावतीने अंदाजे एक कोटी रुपयांच्या रोपवनाची कामे झाल्याची कागदोपत्री नोंद करण्यात आली. या संदर्भात वृत्त मालिकेच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप सुरू होताच चौकशी समिती नेमण्यात आली. चौकशी आणि तपासणीअंती अनेक धक्कादायक बाबी उजेडात आल्या. प्रत्यक्षात कामे करताना लाखो रुपयांचा चुना लावण्यात आल्याचे उघडकीस आले. हजारो रोपटी वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे करपली. दुसरीकडे, शेकडो खड्ड्यातून चक्क प्लास्टिकच्या पिशव्यांसकट झाडे लावण्यात आल्याचे भयानक वास्तवही अधिकाऱ्यांनीही बघितले. या संपूर्ण प्रकरणात बेसलाईन व ग्रेडलाईन न टाकता रोपवन केल्याने खूप मोठे नुकसान झाल्याचाही ठपका ठेवण्यात आला. शिवाय, रोपवनाची संपूर्ण कामे अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार झाली नाहीत. गावातील मजुरांना रोजगार न देता अल्पदरात परप्रांतीय मजुरांना कामावर ठेवले. या संपूर्ण घोटाळ्यात शासकीय योजनाचा चुराडाच करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. त्यानंतर चार जणांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. गुन्हा दाखल व्हावा, यासाठी अनेकांच्या नजरा खिळून होत्या. लोकमतनेही अनेकदा याबाबत आवाज उचलला. यंत्रणा कामाला लागली. उशिरा का होईना वनविभागाला जाग आली. गुन्हा दाखल करण्यास वनविभागाने उशिरा पाऊल उचलले.

Web Title: 9 people accused of corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.