२२ महिन्यांत ९ वाघांची शिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 03:55 AM2018-12-08T03:55:00+5:302018-12-08T03:55:09+5:30
अवनी वाघिणीच्या मृत्यूवरुन मागील काही काळापासून राजकारण तापले आहे. मात्र, महाराष्ट्रात गेल्या २२ महिन्यात ९ वाघांची शिकार करण्यात आली.
नागपूर : अवनी वाघिणीच्या मृत्यूवरुन मागील काही काळापासून राजकारण तापले आहे. मात्र, महाराष्ट्रात गेल्या २२ महिन्यात ९ वाघांची शिकार करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे यातील सर्वच प्रकरणे ही विदर्भातील आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालयाकडे विचारणा केली होती. राज्यात किती वाघांचा मृत्यू झाला, यातील शिकारीची प्रकरणे किती होती, आरोपींविरोधात काय कारवाई झाली, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त माहितीनुसार १ जानेवारी २०१७ ते २० आॅक्टोबर २०१८ या कालावधीत महाराष्ट्रात एकूण ३२ वाघांचे मृत्यू झाले. यातील २२ मृत्यू हे नैसर्गिक होते. १ मृत्यू हा अपघाताने झाला होता. नऊ वाघांची चक्क शिकार करण्यात आली. यात सहा वाघ तर तीन वाघिणींचा समावेश होता. सर्व नऊ वाघांची शिकार २०१७ मध्ये करण्यात आली. शिवाय या घटना नागपूर, चंद्रपूर, वर्धा किंवा गडचिरोली जिल्ह्यातच झाल्या आहेत. सर्वात जास्त तीन शिकारी नागपूर जिल्ह्यात झाल्या. सहा वाघांची विद्युतप्रवाहाद्वारे शिकार करण्यात आली तर तीन वाघांची विषप्रयोग करुन शिकार झाली. २०१८ मध्ये आॅक्टोबर महिन्यापर्यंत एकाही वाघाची शिकार झाली नाही.