विस्तारीकरणात एचसीएलला ९० एकर जागा : ६ हजार जणांना थेट रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 09:32 PM2019-08-17T21:32:39+5:302019-08-17T21:34:03+5:30
मिहानमध्ये आयटी क्षेत्राचा विकास होत असून अनेक कंपन्यांनी आयटी अभियंतांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आता एचसीएल टेक्नॉलॉजिस लि. ही कंपनी आता ९० एकरवर विस्तार करणार असून याद्वारे जवळपास सहा हजारांपेक्षा जास्त जणांना आणखी रोजगार उपलब्ध होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिहानमध्ये आयटी क्षेत्राचा विकास होत असून अनेक कंपन्यांनी आयटी अभियंतांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आता एचसीएल टेक्नॉलॉजिस लि. ही कंपनी आता ९० एकरवर विस्तार करणार असून याद्वारे जवळपास सहा हजारांपेक्षा जास्त जणांना आणखी रोजगार उपलब्ध होणार आहे. कंपनी ३५० कोटींची गुंतवणूक करणार आहे.
एचसीएलने सन २००३ मध्ये १४० एकर जागा विकत घेतली होती. आर्थिक मंदीमुळे एचसीएलने ९० एकर जमीन एमएडीसीला परत करण्याचा प्रस्ताव दिला होता. एचसीएलने १४० एकर जागेचे पैसे अदा केले होते. गेल्या दहा वर्षांत एचसीएलने मिहानमध्ये गुंतवणूक केली नव्हती. प्रकल्प सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एचसीएल कंपनीला युनिट सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. तेव्हा एचसीएलने पहिल्या टप्प्यात ५० एकर जागेवर युनिट सुरू केले. सध्या तिथे जवळपास दीड हजार युवक काम करीत आहेत. बीपीओ आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या दोन क्षेत्रांत एचसीएल काम करीत आहे.
कंपनीला जगभरातून अधिक व्यावसायिक संधी उपलब्ध झाल्या. त्यामुळे कंपनीने ९० एकर जागा परत मागितली. तसा प्रस्ताव एमएडीसीला देण्यात आला, तो तातडीने मान्य करण्यात आला. त्यामुळे आता ९० एकर जागेकरिता केवळ सहयोग करार करण्यात येत आहे. त्यानंतर एचसीएलचा मिहानमधील प्रकल्प पश्चिम भारतातील सर्वात मोठा प्रकल्प ठरणार असल्याचे एमएडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विस्तारीकरणात टीसीएसनेही ५२ एकर जागेची मागणी केलीआहे.
९० एकर जागेवर तीन वर्षांत युनिट उभे करण्यात येणार असून जवळपास सहा हजार जणांना थेट रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पहिला व दुसरा टप्प्या मिळून किमान दहा हजारांहून अधिक युवकांना एचसीएल रोजगार देणार आहे. या दोन्ही टप्प्यांत एचसीएल ४८० कोटींची गुंतवणूक करणार आहे.
विस्तारित जागा हस्तांतरण आज
विस्तारित जागा हस्तांतरण कार्यक्रम रविवार, १८ ऑगस्टला दुपारी ३.३० वाजता वर्धा रोड येथील हॉटेल ली मेरिडियनमध्ये होणार आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि एसएमई मंत्री नितीन गडकरी, आ. समीर मेघे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, एचसीएल टेक्नॉलॉजिसचे मुख्य मानव संशाधन अधिकारी अप्पराव व्ही.व्ही. आणि उपाध्यक्ष (कॉर्पोरेट) संजय गुप्ता उपस्थित राहतील.