९० हत्तीच्या आकाराचा लघुग्रह आज पृथ्वीजवळून जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2023 08:28 PM2023-04-05T20:28:58+5:302023-04-05T20:31:02+5:30
Nagpur News १६ मार्च २०२३ म्हणजे अगदी २० दिवसांपूर्वीच खगाेलशास्त्रज्ञांनी शाेधलेला एक लघुग्रह गुरुवारी ६ एप्रिलला पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. त्याचा आकार ९० हत्तींच्या आकाराएवढा आहे.
नागपूर : १६ मार्च २०२३ म्हणजे अगदी २० दिवसांपूर्वीच खगाेलशास्त्रज्ञांनी शाेधलेला एक लघुग्रह गुरुवारी ६ एप्रिलला पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. त्याचा आकार ९० हत्तींच्या आकाराएवढा आहे. पण पृथ्वीवासीयांना घाबरण्याची गरज नाही कारण ताे ३० लाख किलाेमीटर दूरवरून जात असेल.
खगाेलशास्त्रज्ञांनी ‘२०२३ एफएम’ असे नाव या लघुग्रहाला दिले आहे. ‘२०२३ एफएम’ लघुग्रह १६ किलोमीटर प्रतिसेकंद वेगाने पृथ्वीजवळून भ्रमंती करत आहे. त्यामुळे हा कुतूहलाचा विषय ठरत आहे. पृथ्वी व चंद्र आपल्या गुरुत्वाकर्षणाद्वारे लघुग्रहाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करू शकते. चंद्राच्या गुरुत्वकर्षांमुळे लघुग्रहाची दिशा भरकटण्याची चिन्हे आहेत. जर हा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर दोन किलोमीटर परिसरात हानी होईल. मात्र, सध्या तरी हा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.
हा लघुग्रह हानीकारक नसला तरी नासाने दुसरा एक लघुग्रह शाेधला आहे, जाे वैज्ञानिकांसाठी चिंतेचे कारण ठरला आहे. ताे म्हणजे ‘२०२३ डिडब्ल्यू’ हा लघुग्रह. या लघुग्रहाचा आकार ५० मीटर व्यासाचा म्हणजे ऑलिम्पिकच्या जलतरण तलावाएवढा आहे. ‘एफएम’ पेक्षा लहान असला तरी ताे धाेकादायक ठरण्याची शक्यता आहे. हा लघुग्रह २०४६ च्या व्हॅलेंटाईनच्या दिवशी पृथ्वीच्या जवळून जाईल, असे ‘नासा’च्या वैज्ञानिकांनी नमूद केले आहे.