नागपुरात स्वर्णजयंती एक्स्प्रेसमध्ये बीअरच्या ९६ बाटल्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 09:41 PM2018-05-28T21:41:48+5:302018-05-28T21:42:33+5:30
दारूबंदी असलेल्या चंद्रपुरात रेल्वे मार्गाने दारूची तस्करी सुरूच असून सोमवारी रात्री १.५० वाजता रेल्वे सुरक्षा दलाने स्वर्णजयंती एक्स्प्रेसमधून बीअरच्या १२ हजार ९६० रुपये किमतीच्या ९६ बॉटल जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारूबंदी असलेल्या चंद्रपुरात रेल्वे मार्गाने दारूची तस्करी सुरूच असून सोमवारी रात्री १.५० वाजता रेल्वे सुरक्षा दलाने स्वर्णजयंती एक्स्प्रेसमधून बीअरच्या १२ हजार ९६० रुपये किमतीच्या ९६ बॉटल जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या आहेत.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी गठित केलेल्या चमूतील सदस्यांना गुप्त बातमीदाराकडून स्वर्णजयंती एक्स्प्रेसमधून दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार सहायक उपनिरीक्षक रामनिवास यादव, विवेक कनोजिया, योगेश चित्ते, जसवीर सिंह, एन. पी. वासनिक, अनिल उसेंडी यांनी रात्री १.५० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर उभ्या असलेल्या रेल्वेगाडी क्रमांक १२८०४ हजरत निजामुद्दीन- विशाखापट्टनम स्वर्णजयंती एक्स्प्रेसच्या जनरल कोचची तपासणी केली. यावेळी चार ठिकाणी बेवारस बॅग आढळल्या. आजूबाजूच्या प्रवाशांना बॅगबाबत विचारणा केली असता त्यावर कोणीच आपला हक्क सांगितला नाही. बॅगची तपासणी केली असता त्यात मध्य प्रदेशातील बीअरच्या ५०० मिलिलीटरच्या ९६ बॉटल आढळल्या. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.