नागपुरातील ९० टक्के संशयितांचे नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 09:10 PM2020-04-16T21:10:49+5:302020-04-16T21:12:37+5:30
आमदार निवास, रविभवन, वनामती, लोणारा व सिम्बॉयसिस या पाच संस्थात्मक अलगीकरण कक्षात आजच्या तारखेपर्यंत ५६० संशयित दाखल आहेत. यातील ९० टक्के संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठवून तीन ते चार दिवस झाले आहेत, परंतु अनेकांना अहवाल प्राप्त झालेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आमदार निवास, रविभवन, वनामती, लोणारा व सिम्बॉयसिस या पाच संस्थात्मक अलगीकरण कक्षात आजच्या तारखेपर्यंत ५६० संशयित दाखल आहेत. यातील ९० टक्के संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठवून तीन ते चार दिवस झाले आहेत, परंतु अनेकांना अहवाल प्राप्त झालेला नाही. आम्हाला घरी सोडू नका, किमान अहवाल सांगा, अशी मागणी केली जात आहे.
दिल्लीहून आलेले आणि सतरंजीपुऱ्यातील मृताच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात आलेले संशयित मोठ्या संख्येत संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. पहिला, सातवा व १४ दिवसानंतरचा नमुना निगेटिव्ह आल्यावर आणि लक्षणे नसल्यावरच संशयितांना घरी सोडण्याचा नियम आहे. परंतु अलिकडे हा नियम काहींसाठी बदलला आहे. पहिल्या व सात दिवसानंतर निगेटिव्ह येणाऱ्यानमुन्याच्या संशयिताला घरी पाठविले जात आहे. यामुळे अनेकांना आपला अहवाल काय आला, याची प्रतीक्षा आहे. प्राप्त माहितीनुसार, या पाचही संस्थात्मक अलगीकरण कक्षात असलेल्या ५६० संशयितांमधील ९० टक्क्यांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे. यातील बहुसंख्य संशयितांचा पहिला नमुना निगेटिव्ह आला आहे. १३ व १४ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवालांची अनेकांना प्रतीक्षा आहे. काही संशयितांच्या मते, क्वारंटाइन होऊन सात दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. पहिला नमुना निगेटिव्ह आला आहे. सात दिवसानंतरचे नमुनेही घेतले आहेत. परंतु चार दिवस होऊनही अहवाल काय आला, याची माहिती सांगितली जात नाही. आमदार निवासात व लोणारा येथील अलगीकरण कक्षात काही संशयित पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे मनात एक भीती असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार काही लोकांंचा अहवाल सात दिवसानंतर निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडले जात आहे. हाच नियम सर्वांसाठी का नाही असा प्रश्नही उपस्थित केला आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगावे, असेही त्यांचे म्हणणे आहे.