आणखी धावतील ९० आपली बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:11 AM2021-08-20T04:11:22+5:302021-08-20T04:11:22+5:30
आयुक्तांची हिरवी झेंडी : प्रवाशांना मोठा दिलासा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात २०० आपली बस धावत आहेत. पुन्हा ...
आयुक्तांची हिरवी झेंडी : प्रवाशांना मोठा दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात २०० आपली बस धावत आहेत. पुन्हा ९० बस सुरू करण्याला महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी हिरवी झेंडी दिली आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावर २९० बस धावतील.
बाजार, शॉपिंग मॉल यासह व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू झाल्याने प्रवाशांना अडचणी येत होत्या. शहरातील बससेवा पूर्ण क्षमतेने चालविण्याची नागरिकांची मागणी होती. सार्वजनिक परिवहन सेवेची जबाबदारी मनपावर आहे. नागरिकांची अडचण विचारात घेता, पूर्ण क्षमतेने ही सेवा सुरू करण्याची नितांत गरज आहे.
बससेवेमुळे होणारा तोटा विचारात घेता, मनपा प्रशासनाकडून बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास टाळाटाळ केली जात होते. यात सत्तापक्षाची भूमिका बघ्याची होती. लोकमतने प्रवाशांचे हित विचारात घेता, हा मुद्दा लावून धरला होता. त्यानंतर सत्ताधाऱ्यांना जाग आली. विशेष म्हणजे, मागील सहा महिने सत्तापक्षातील वादामुळे परिवहन सभापतिपद रिक्त होते. अखेर बुधवारी उपायुक्त रवींद्र भेलावे यांनी ९० बस पुन्हा सुरू करण्याचे आदेश जारी केले.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ऑरेंज सिटी स्ट्रीट डेपोतून ९५ बसेस २३ मार्गावर, पटवर्धन मैदान डेपोतून ९५ बसेस २६ मार्गावर, खापरी डेपोतून ५२ बसेस १५ मार्गावर, कोराडी डेपोतून ४२ बसेस २१ मार्गावर तर मातृशक्ती डेपोतून ६ बसचे संचालन सुरू होईल.
...
दररोज ६५ हजार प्रवासी
सध्या २०० बसेस धावत आहेत. यातून दररोज ६५ हजार प्रवासी प्रवास करतात. बसची संख्या वाढल्याने प्रवाशांची संख्या वाढणार आहे. कोरोना संक्रमणापूर्वी शहरात दररोज ३६० बस धावत होत्या. दीड लाखाहून अधिक प्रवासी होते.
....
कामगारांना मिळणार दिलासा
आपली बस पूर्ण क्षमतेने चालविण्याची नागरिकांची मागणी आहे. शहरातील अनेक मार्गावर अजूनही बसेस सोडल्या जात नाही. परंतु आयुक्तांनी ७० टक्के बस संचालनाला मंजुरी दिल्याने ९० बसेस वाढतील. यामुळे कामगार व गरीब वर्गाला दिलासा मिळाला आहे.