जिल्ह्यात 'कोरोना'च्या ९० पॉझिटिव्ह रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 10:18 AM2022-01-03T10:18:12+5:302022-01-03T10:29:30+5:30
जिल्ह्यात मागील २४ तासांत तपासण्यांची संख्या वाढली. ५,४८८ तपासण्यांमधून पॉझिटिव्हिटीचा दर १.६ टक्क्यांवर आला आहे. अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेले दोघे पॉझिटिव्ह आले असून त्यांच्याकडे ओमायक्रॉनबाधित संशयित रुग्ण म्हणून पाहिले जात आहे.
नागपूर : कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत असल्याने चिंता वाढली आहे. ३१ डिसेंबर रोजी ९० रुग्ण पॉझिटिव्ह आले असताना रविवारी पुन्हा ९० रुग्णांची भर पडली. तीन दिवसांत २३४ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ४,९४,१९३ तर मृतांची संख्या १०,१२३ आहे.
नागपूर जिल्ह्यात मागील २४ तासांत तपासण्यांची संख्या वाढली. ५,४८८ तपासण्यांमधून पॉझिटिव्हिटीचा दर १.६ टक्क्यांवर आला आहे. शहरात झालेल्या ३,५४५ तपासणीमधून ७३, तर ग्रामीणमध्ये झालेल्या १,९४३ तपासणीमधून ९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. जिल्ह्याबाहेरील ८ बाधितांची भर पडली. आज ५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ४,८३,६६४ झाली आहे.
- अमेरिकेतून आलेले दोघे पॉझिटिव्ह
अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेले दोघे पॉझिटिव्ह आले असून यांच्याकडे ओमायक्रॉनबाधित संशयित रुग्ण म्हणून पाहिले जात आहे. ६७ वर्षीय पुरुष व ६५ वर्षीय महिला २६ डिसेंबर रोजी अमेरिकेतून नागपुरात परतले. पहिली कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली असताना ७ दिवसांनंतर पुन्हा चाचणी केल्यावर दोघेही पॉझिटिव्ह आले. हे दोन्ही प्रवासी हनुमाननगर झोनमधील आहेत.
-लक्ष्मीनगर परिसरात सर्वाधिक रुग्ण
मनपाच्या लक्ष्मीनगर झोन परिसरातील वस्त्यांमध्ये रविवारी सर्वाधिक बाधित रुग्ण आढळून आले. १८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्यानंतर धंतोली झोनमध्ये १२, मंगळवारी झोनमध्ये ९, धरमपेठ व लकडगंज झोनमध्ये प्रत्येकी ८, आसीनगर झोनमध्ये ५, नेहरूनगर झोनमध्ये ४ तर गांधीबाग झोनमध्ये ५ रुग्ण आढळून आले.
-शहरात ३३५ तर ग्रामीणमध्ये ३५ सक्रिय रुग्ण
शहरात सक्रिय रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रविवारी ही संख्या ४०६ वर पोहोचली. यात शहरातील ३३५, ग्रामीणमधील ३५, तर जिल्हा बाहेरील १६ रुग्णांचा समावेश आहे.
-रविवारी या भागात आढळले बाधित रुग्ण
मनपा झोन : रुग्ण
लक्ष्मीनगर : १८
धरमपेठ : ०८
हनुमाननगर : ०७
धंतोली : १२
नेहरूनगर : ०४
गांधीबाग : ०२
सतरंजीपुरा : ००
लकडगंज : ०८
आसीनगर : ०५
मंगळवारी : ०९