नागपूर जि.प.मध्ये दिसणार ९० टक्के नवे चेहरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 08:37 PM2019-11-20T20:37:46+5:302019-11-20T20:38:51+5:30
२०१२ मध्ये काढण्यात आलेले आरक्षण आणि सद्याच्या आरक्षणात ९० टक्के फरक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये यंदा ९० टक्के नवीन चेहरे दिसण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरक्षणामुळे जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे गणित बिघडले आहे. सर्कल पुनर्रचनेत काही मतदार संघ गायब झाले आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या गोतमारे व निशा सावरकर यांचे सर्कल सेफ आहे तर माजी उपाध्यक्ष शरद डोणेकर व माजी विरोधी पक्ष नेते मनोहर कुंभारे यांचे सर्कल राखीव झाले आहे. माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांचा मेटपांजरा सर्कल सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने त्यांना संधी आहे. पण २०१२ मध्ये काढण्यात आलेले आरक्षण आणि सद्याच्या आरक्षणात ९० टक्के फरक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये यंदा ९० टक्के नवीन चेहरे दिसण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या ५८ जागांपैकी अनुसूचित जातीसाठी १० (महिला ५), अनुसूचित जमाती ७ (महिला ४), नामाप्र १६ (महिला ८) व सर्वसधारण प्रवर्गासाठी २५ (महिला १२) जागा राखीव झाल्या आहे.
सर्कल पुनर्रचना व आरक्षणामुळे भाजपा, काँग्रेस, शिवसेना, राकाँसह इतर पक्षाच्या विद्यमान सदस्यापुढे संकट निर्माण झाले आहे. अनेकांवर घरी बसण्याची वेळ येणार असून काहींनी आपल्या अर्धांगिनीला मैदानात उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यात जि.प. उपाध्यक्ष शरद डोणेकर, शिक्षण सभापती उकेश चव्हाण, समाजकल्याण सभापती दीपक गेडाम, कृषी व पशुसंवर्धन विभाग सभापती आशा गायकवाड, सत्तापक्ष नेता विजय देशमुख, विरोधी पक्षनेता मनोहर कुंभारे, काँग्रेसचे शिवकुमार यादव, शांताराम मडावी, उपासराव भुते, मनोज तितरमारे, पद्माकर कडू, नंदा नारनवरे, भाजपचे विनोद पाटील, रुपराव शिंगणे, अरुणा मानकर, सुरेंद्र शेंडे, जयकुमार वर्मा, कमलाकर मेंघर, केशव कुमरे, डॉ. शिवाजी सोनसरे आदी नेत्यांचा पत्ता साफ झाला आहे. ते आता कोणती भूमिका वठवितात, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
दोन सभापतींना संधी, दोघांची गोची
जिल्हा परिषदेतील सभापतींचीही गोची झाली आहे. समाजकल्याण सभापती दीपक गेडाम यांचे चिचोली सर्कल सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहे. शिक्षण सभापती उकेश चव्हाण यांचे बेलोना सर्कल अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झाले आहे. या तालुक्यातील इतर सर्कलमध्येही त्यांना संधी नाही. कृषी सभापती आशा गायकवाड (शिवसेना) यांचे कांद्री-सोनेघाट सर्कल सर्वसाधारण झाले आहे. महिला बाल कल्याण सभापती पुष्पा वाघाडे (बसपा) यांचे मकरधोकडा सर्कल सर्वसाधारण झाले आहे. त्यामुळे त्यांना संधी आहे. मात्र दोन्ही ठिकाणी सर्वसाधारण जागा झाल्यामुळे त्या स्वत: लढणार की त्यांचे पती रिंगणात उतरतात याकडे लक्ष लागले आहे.
कुठे पत्नीला तर कुठे पतीला संधी
कुही तालुक्यातील काँग्रेसचे माजी सदस्य उपासराव भुते यांचे मांढळ सर्कल व मनोज तितरमारे यांचे वेलतूर सर्कल, डॉ. शिवाजी सोनसरे यांचा सिल्ली सर्कल सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित झाले आहे. भाजपचे जयकुमार वर्मा यांचे बेला सर्कल सर्वसाधारण महिला झाले आहे. पद्माकर कडू यांचे वायगाव सर्कल सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे या सर्कलमधून त्यांना संधी नाही. परंतु त्यांचा पत्नी रिंगणात दिसू शकतात. अरोली कोदामेंढी सर्कल नामाप्र झाले आहे. त्यामुळे शकुंतला हटवार यांचे पती अशोक हटवार यांना संधी आहे. माजी सभापती वर्षा धोपटे यांचे नगरधन-भांडारबोडी सर्कल सर्वसाधारण झाले आहे. त्यांचे पती नरेश धोपटे हे दोन वेळा जि.प. सदस्य राहिले आहेत. यावेळी ते रिंगणात उतरू शकतात.