समृद्धी महामार्गासाठी नागपूर जिल्ह्यातील ९० टक्के जमीन उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 11:47 AM2018-05-10T11:47:08+5:302018-05-10T11:47:23+5:30

नागपूर-मुंबई या राज्य शासनाच्या प्राधान्यक्रम असलेल्या समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी नागपूर व वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ९०.१५ टक्के जमीन उपलब्ध झाली आहे.

90 percent of the land available in the Nagpur district for the Samrudhi highway | समृद्धी महामार्गासाठी नागपूर जिल्ह्यातील ९० टक्के जमीन उपलब्ध

समृद्धी महामार्गासाठी नागपूर जिल्ह्यातील ९० टक्के जमीन उपलब्ध

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांना ६१४ कोटी ३० लाख रुपये मोबदला विभागातील ७०० हेक्टर आर जमिनीच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर-मुंबई या राज्य शासनाच्या प्राधान्यक्रम असलेल्या समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी नागपूर व वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ९०.१५ टक्के जमीन उपलब्ध झाली आहे. यामध्ये नागपुरातील ९५.२३ टक्के तर वर्धा जिल्ह्यातील ८७.९४ टक्के जमीन उपलब्ध झाली आहे.
समृद्धी महामार्गासाठी नागपूर व वर्धा जिल्ह्यातील एकूण १ हजार ४३ हेक्टर जमिनीची आवश्यकता असून यामध्ये खासगी वाटाघाटीने ८०२.८५ हेक्टर जमीन खरेदी करावयाची आहे. तर १८७.६७ हेक्टर शासकीय जमीन या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आली आहे. विभागातील १ हजार १६० गटातील शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करावयाची असून त्यापैकी १ हजार ००६ गटातील शेतकऱ्यांकडून ७००.२८ हेक्टर आर जमीन प्रत्यक्ष खरेदी करण्यात आली आहे.
जमीन खरेदीसाठी शेतकरी सभासदांना ६१४ कोटी ३० लाख ३३ हजार ८३१ रुपये अदा करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील २१ गावातील २८.४२ किलोमीटर जमिनीच्या खरेदीला सुरुवात झाली. यामध्ये २७९ गट क्रमांकातील २०२.१९ हेक्टर आर जमिनीच्या खरेदीची प्रक्रिया सुरू झाली. त्यापैकी २४९ गट क्रमांकातील शेतकऱ्यांनी १८७.१५ हेक्टर आर जमीन उपलब्ध करून दिली आहे. यासाठी शेतकऱ्यांना २४५ कोटी ९२ लाख रुपये मोबदला देण्यात आला आहे. जिल्ह्यात सरासरी ९५.२३ टक्के शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला जमीन उपलब्ध करून दिली आहे. तसेच ९७.५२ हेक्टर आर ही शासकीय जमीन असून १५.८३ हेक्टर आर हे वनजमिनीचे क्षेत्र आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील एकूण २८४.६७ हेक्टर आर जमीन उपलब्ध झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि आर्वी या तालुक्यातील ३४ गावातील ६०.७३ किलोमीटर लांबीसाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू असून यामध्ये ९०.१५ हेक्टर आर जमीन शासकीय तर ३४.७७ हेक्टर आर जमीन आहे. तसेच ६००.६६ हेक्टर आर जमीन खरेदी करण्यात येत आहे. ८८१ गट क्रमांकातील शेतकऱ्यांकडून खरेदीची प्रक्रिया करण्यात आली असून त्यापैकी ५१३.१३ हेक्टर जमीन उपलब्ध झाली आहे. या जमिनीचा मोबदला म्हणून ३६८ कोटी ३७ लक्ष ४६ हजार २९८ रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. जिल्ह्यात ८७.९३ टक्के जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सेलू तालुक्यातील १६ गावातील २५.१६ किलोमीटर, वर्धा तालुक्यातील १० गावातील २३.०९ किलोमीटर तर आर्वी तालुक्यातील ८ गावातील ११.६७ किलोमीटर महामार्गाच्या लांबीसाठी जमीन खरेदी करण्यात येत आहे. त्यापैकी आर्वी तालुक्यात ९०.१० टक्के, वर्धा तालुक्यात ९१.१४ टक्के तर सेलू तालुक्यात ८३.९८ टक्के जमीन उपलब्ध झाली आहे.

Web Title: 90 percent of the land available in the Nagpur district for the Samrudhi highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.