जि.प.मध्ये ९० टक्के नवे चेहरे
By admin | Published: October 6, 2016 02:47 AM2016-10-06T02:47:50+5:302016-10-06T02:47:50+5:30
नागपूर जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत विद्यमान ९० टक्के सदस्यांना फटका बसला आहे. पुनर्रचनेत काहींचे मतदारसंघच गायब झाले आहेत.
नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत विद्यमान ९० टक्के सदस्यांना फटका बसला आहे. पुनर्रचनेत काहींचे मतदारसंघच गायब झाले आहेत. जि.प.च्या विद्यमान अध्यक्ष निशा सावरकर व माजी अध्यक्ष संध्या गोतमारे यांचे मतदारसंघ सेफ असून विद्यमान उपाध्यक्ष शरद डोणेकर व माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांच्यासह विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांचेही सर्कल राखीव झाल्याने ते रिंगणातून बाद झाले आहेत. जि.प.च्या २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी ५८ सर्कलची आरक्षण सोडत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात पार पडली. तर १३ पंचायत समिती स्तरावर ११६ पंचायत समिती गटासाठी सोडत काढण्यात आली. जिल्हा परिषदेच्या ५८ जागांपैकी अनुसूचित जातीसाठी १० (महिला ५), अनुसूचित जमाती ७ (महिला ४), नामाप्र १६ (महिला ८) व सर्वसधारण प्रवर्गासाठी २५ (महिला १२) जागा राखीव झाल्या.
कुठे पत्नीला तर कुठे पतीला संधी
काँग्रेसचे सदस्य उपासराव भुते यांचे मांढळ सर्कल व मनोज तितरमारे यांचे वेलतूर सर्कल सर्वसाधारण महिला झाले आहे. भाजपचे जयकुमार वर्मा यांचे बेला सर्कल सर्वसाधारण महिला झाले आहे. त्यामुळे या नेत्यांच्या पत्नी रिंगणात दिसू शकतात. अरोली कोदामेंढी सर्कल नामाप्र झाले आहे. त्यामुळे शकुंतला हटवार यांचे पती अशोक हटवार यांना संधी आहे. माजी सभापती वर्षा धोपटे यांचे नगरधन-भांडारबोडी सर्कल सर्वसाधारण झाले आहे. त्यांचे पती नरेश धोपटे हे दोन वेळा जि.प. सदस्य राहिले आहेत. यावेळी ते रिंगणात उतरू शकतात.
तारसा-चाचेरमध्ये शिवसेनेत टसल
शिवसेनेच्या भारती गोडबोले यांचे मौदा बाबदेव सर्कल तुटले आहे. मौदा नगर पंचायत झाली. उर्वरित गावे खात व तारसा-चाचेर या सर्कलमध्ये विभागली गेली. त्यामुळे आता त्यांचे पती देवेंद्र गोडबोले हे तारसा- चाचेर या सर्कलमधून लढू शकतात. मात्र, या सर्कलमधून शिवसेनेच्या नंदा लोहबरे या सदस्य आहेत. शिवाय ही जागा सर्वसाधारण झाल्यामुळे त्यांना संधी आहे. त्यामुळे आता या जागेवर लोहबरे व गोडबोले या शिवसैनिकांमध्येच तिकीटासाठी रस्सीखेच पहायला मिळेल.
कळमेश्वर, काटोल, नरखेड, सावनेरमध्ये ‘नो रिपीट’
कळमेश्वर, काटोल व नरखेड या तीनही तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद सदस्यांची संधी हुकली आहे. या तिन्ही तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य असलेल्या एकाचेही सर्कल शाबूत राहिलेले नाही. काटोल, नरखेडमध्ये तर आजूबाजूच्या सर्कलमध्येही लढण्याची संधी नाही. कळमेश्वरात अरुणा मानकर यांना ब्राह्मणीत संधी आहे. सावनेर तालुक्यातही विद्यमान ७ पैकी ६ सदस्यांना ही निवडणूक लढता येणार नाही. वलनीतून फक्त छाया ढोले यांना संधी आहे.
दोन सभापतींना संधी, दोघांची गोची
जिल्हा परिषदेतील विद्यमान सभापती व माजी सभापतींचीही गोची झाली आहे. विद्यमान समाजकल्याण सभापती दीपक गेडाम यांचे चिचोली सर्कल सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहे. शिक्षण सभापती उकेश चव्हाण यांचे बेलोना सर्कल अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झाले आहे. या तालुक्यातील इतर सर्कलमध्येही त्यांना संधी नाही. कृषी सभापती आशा गायकवाड (शिवसेना) यांचे कांद्री-सोनेघाट सर्कल सर्वसाधारण झाले आहे. महिला बाल कल्याण सभापती पुष्पा वाघाडे (बसपा) यांचे मकरधोकडा सर्कल सर्वसाधारण झाले आहे. त्यामुळे त्यांना संधी आहे. मात्र दोन्ही ठिकाणी सर्वसाधारण जागा झाल्यामुळे त्या स्वत: लढणार की त्यांचे पती रिंगणात उतरतात याकडे लक्ष लागले आहे.
माजी सदस्यांमध्ये कही खुशी कही गम
काँग्रेसच्या माजी जि.प. सदस्य कुंदा राऊत यांचे फेटरी-बोकारा सर्कल गेल्यावेळी अनुसूचित जातीसाठी राखीव झाले होते. यावेळी या सर्कलचे नाव गोधनी रेल्वे असे झाले असून नामप्र महिला आरक्षण निघाले आहे. त्यामुळे राऊत यांना पुन्हा लढण्याची संधी आहे. भाजपचे माजी जि.प. सदस्य अनिल निदान यांनाही गेल्यावेळी आरक्षणाचा फटका बसला होता. या वेळी गुमथळा-महालगाव हे सर्कल सर्वसाधारण झाल्यामुळे ते खूश आहेत. वानाडोंगरी येथून काँग्रेसचे माजी सत्तापक्ष नेते बाबा आष्टनकर तसेच पारशिवनी सर्कल यावेळी नामाप्र महिला झाल्यामुळे अस्मीता मिरे यांनाही संधी आहे. भाजपचे माजी जि.प. सदस्य आनंदराव राऊत, नितीन राठी, राजेश जीवतोडे, राष्ट्रवादीचे बंडू उमरकर, सतीश शिंदे, काँग्रेसचे हर्षवर्धन निकोसे यांना मात्र नशिबाने साथ दिली नाही.