उपराजधानीतील पाण्याचे ९६ टक्के नमुने पिण्यायोग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 12:41 PM2020-03-02T12:41:27+5:302020-03-02T12:42:57+5:30
नागपूर महापालिकेद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याचे काही नमुने घेतले असता, ९६ टक्के पाण्याचे नमुने पिण्यायोग्य असल्याचे निदर्शनास आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील बहुतांश महापालिकांना दूषित पाण्याची समस्या भेडसावत असताना, नागपूर महापालिका शहरभरात स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत आहे. महापालिकेद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याचे काही नमुने घेतले असता, ९६ टक्के पाण्याचे नमुने पिण्यायोग्य असल्याचे निदर्शनास आले. देशात सर्वात शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा नागपूर महापालिकेतर्फे करण्यात येत असल्याचा दावा होत आहे.
महापालिकेतर्फे राबविण्यात येणाºया २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेंतर्गत जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या व शहरातील सर्व नळजोडण्या, या दूषित पाण्याचे प्रमुख कारण होते. त्या जलवाहिन्या बदलण्याचे काम सातत्याने सुरू आहे. मनपा व ओसीडब्ल्यू यांनी आतापर्यंत ६८७ किमी जलवाहिन्या व २.३१ लाख नळजोडण्या बदलल्या आहेत. त्यामुळे पाणी प्रदूषित होण्याचा धोका कमी झाला आहे. मनपाने पाण्याच्या गुणवत्तेची देखरेख करण्यासाठी स्वतंत्र चमू तयार केली आहे. ही चमू जलकुंभ व संपूर्ण वितरण व्यवस्थेत क्लोरिनची पातळी राखण्याचे काम करते. याच चमूद्वारे शहरातील विविध ठिकाणांहून दर महिन्याला १५०० पाण्याचे नमुने गोळा करून, प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठविले जातात. प्रयोगशाळेत तपासण्यात येणाºया पाण्याच्या नमुन्यात ९५ ते ९९ टक्के नमुने पिण्यायोग्य असतात. जेथील नमुने पिण्यायोग्य नाही, तिथे आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येते. जलकुंभ हे पाणीपुरवठा यंत्रणेतील महत्त्वाचा घटक आहे. मनपाने वार्षिक जलकुंभ स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होत आहे.
हजारोंच्या संख्येने अवैध नळजोडण्या
शहरात मोठ्या प्रमाणात अवैध नळजोडण्या आहेत. बेकायदेशीर पद्धतीने केलेल्या नळजोडण्या सार्वजनिक मालमत्ता असलेल्या जलवाहिन्यांना क्षति पोहचवीत आहे. त्यातून दूषित पाण्याचा धोका आहे. महसुलाचेही नुकसान होत आहे. मनपाने अशा लोकांविरुद्ध कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. जलवाहिन्यांवर असलेले अतिक्रमणसुद्धा एक आवाहन आहे. अनेक ठिकाणी जलवाहिन्यांवर रस्ते, इमारती व इतर बांधकाम करण्यात आलेले आहे.