महाविद्यालयांमध्ये ९० हजार जागा रिकाम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 10:28 PM2020-09-19T22:28:33+5:302020-09-19T22:29:49+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. पूर्वनिर्धारित कार्यक्रमांच्या अनुषंगाने महाविद्यालयात प्रवेशाची अंतिम तारीख १५ सप्टेंबर होती. हा निर्णय महाविद्यालयांमध्ये असलेल्या रिकाम्या जागा बघता घेण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. पूर्वनिर्धारित कार्यक्रमांच्या अनुषंगाने महाविद्यालयात प्रवेशाची अंतिम तारीख १५ सप्टेंबर होती. हा निर्णय महाविद्यालयांमध्ये असलेल्या रिकाम्या जागा बघता घेण्यात आला आहे.
सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत विद्यापीठामध्ये ९० हजारहून अधिक जागा रिकाम्या आहेत. सर्वाधिक ३२ हजार जागा कला शाखेमध्ये भरणे आहे तर वाणिज्य शाखेत २८ हजारहून अधिक जागा अद्याप भरलेल्या नाहीत. वर्तमानात अभियांत्रिकी व फार्मसीच्या अभ्यासक्रमासाठी एमएचटी-सीईटी नसल्याने, त्याचा सर्वाधिक लाभ विज्ञान शाखेला झाला आहे. या अभ्यासक्रमातील सर्वाधिक जागा भरलेल्या आहेत. तरीदेखील अजूनही विज्ञान शाखेच्या १७ हजार जागा रिकाम्या आहेत आणि अन्य शाखांमध्येही बऱ्याच जागा अद्याप भरलेल्या नाहीत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रथम वर्षाशिवाय अन्य सत्रासाठीचे प्रवेशही कमी झालेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी कोरोनामुळे महाविद्यालयात प्रवेशासाठी अर्ज सादर केले नाहीत. रिकाम्या जागा बघता महाविद्यालयांकडूनच प्रवेश प्रक्रियेसाठी मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. त्याअनुषंगानेच प्रवेशाची मुदत ३० सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. या संदर्भात विद्यापीठाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ज्या अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश समितींतर्गत होतात, त्यांच्यासाठी ही मुदत लागू राहणार नाही. या संदर्भात विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.