वीज बिल अपडेट न झाल्याची मारली थाप, ९१ वर्षीय वृद्धाला ४.९० लाखांचा ऑनलाईन गंडा
By योगेश पांडे | Published: August 23, 2022 04:13 PM2022-08-23T16:13:14+5:302022-08-23T16:18:56+5:30
सिव्हील लाईन्स येथील घटना
नागपूर : वीज बिल अपडेट न झाल्याची थाप मारत सिव्हिल लाईन्स येथील एका ९१ वर्षीय वृद्ध इसमाची ४.९० लाखांनी ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. संबंधित आरोपीसोबत ओटीपी शेअर करणे त्यांना महागात पडले.
स्टॅनली जोसेफ नाजरेल (९१) हे सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रसागर अपार्टमेंट, सिव्हील लाईन्स येथे राहतात. १६ ऑगस्ट रोजी दुपारी त्यांच्या मोबाईलवर मुकेश शर्मा नावाच्या व्यक्तीचा ७५९५८४३३२९ या क्रमांकावरून फोन आला. मे ते जून या कालावधीतील वीज बिल अपडट न झाल्याचे कारण सांगत त्याने स्टॅनली यांना एसएमएस टू फोन हे मोबाईल ॲप डाऊनलोड करायला सांगितले.
स्टॅनली यांनी तसे केल्यावर शर्माने सांगितलेली प्रक्रिया पूर्ण केली. समोर आलेल्या अर्जात त्यांनी बॅंक ऑफ इंडियाच्या खात्यातील डेबिट कार्ड क्रमांक, सीव्हीसी क्रमांक व एक्स्पायरी डेट ही माहिती भरली व मोबाईलवर आलेला ओटीपी आरोपीला सांगितला. काही वेळातच आरोपीने वेळोवेळी त्यांच्या बॅंक खात्यातून ४ लाख ९० हजार रुपये वळते केले. ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच स्टॅनली यांनी सिताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.