बार्टीला ९१.५० कोटींचा निधी तातडीने वितरित; आंदोलनाचा धसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 09:39 PM2021-09-13T21:39:23+5:302021-09-13T21:39:51+5:30
Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे(बार्टी)ला सोमवारी ९१.५० कोटी रुपयांचा निधी तातडीने वितरित करण्यात आला असून, बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे(बार्टी)ला सोमवारी ९१.५० कोटी रुपयांचा निधी तातडीने वितरित करण्यात आला असून, बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे. (91.50 crore to Barti immediately)
मागील दोन वर्षांपासून बार्टीच्या अनेक योजना निधीअभावी बंद पडल्या आहेत. निधी मिळत नसल्याने बार्टीला बंद केले जात असल्याचीही चर्चा होती. या पार्श्वभूमीवर विविध विद्यार्थी संघटनांनी १४ सप्टेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनांतर्गत शासनाला जाब विचारला जाणार होता. सोशल मीडियावर या आंदोलनाला वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन, राज्य शासनाने सोमवारी बार्टीला ९१.५० कोटींचा निधी तातडीने वितरित केला. तसेच बार्टीची कोणतीही योजना बंद पडणार नाही. बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासनही मुंडे यांनी दिले.
यासंदर्भात तातडीने शासन निर्णयसुद्धा जारी केले. यानुसार बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आदींसाठी ९० कोटी रुपये तसेच महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक देखभाल समितीसाठी दीड कोटी असे एकूण ९१.५० कोटी रुपये सोमवारी तातडीने वितरित केले. दरम्यान, बार्टीमार्फत राबविण्यात येत असलेल्या सर्व योजना, प्रशिक्षण कार्यक्रम आदींची सद्यस्थिती जाणून घेत काही नवीन योजना आखण्यात येत आहेत, याबाबत बार्टी स्तरावर लवकरच एक बैठक घेण्यात येणार असल्याचेही मुंडे यांनी स्पष्ट केले.
- आंदोलन स्थगित पण पाठपुरावा करणार
विद्यार्थी व समाजातील एकजुटीचा हा विजय आहे. ही रक्कम तातडीने बार्टीला देऊन बंद कोर्सस सुरू करावेत आणि यासंदर्भात सर्व विभागाचे सामाजिक लेखापरीक्षण करण्यात यावे. आंदोलन स्थगित करण्यात आले. परंतु बार्टीच्या महासंचालकांशी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार. तसेच शेवटपर्यंत पाठपुरावा सुरू राहणार.
कुलदीप आंबेकर
अध्यक्ष स्टुडंट हेल्पिंग हॅन्ड