विदर्भात २२ लाख ग्राहकांकडे ९२३ कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:12 AM2021-09-10T04:12:01+5:302021-09-10T04:12:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विदर्भातील महावितरणच्या २२ लाख ग्राहकांकडे ९२३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. अशा परिस्थितीत महावितरण कंपनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील महावितरणच्या २२ लाख ग्राहकांकडे ९२३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. अशा परिस्थितीत महावितरण कंपनी टिकवायची असेल तर वीजबिल वसुलीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे वीजबिल वसुलीत हयगय केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी दिला.
नागपूर प्रादेशिक विभागअंतर्गत येणाऱ्या पाचही परिमंडळातील मुख्य अभियंते, अधीक्षक आणि कार्यकारी अभियंते यांची बैठक नागपुरात पार पडली. नागपूर प्रादेशिक विभागातील कर्मचाऱ्यांनी थकबाकी वसुली करा. ३० युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या ग्राहकांची काटेकोर तपासणी करावी, तात्पुरता व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असणाऱ्या ग्राहकांवर लक्ष ठेवून वीजचोरी आढळल्यास कठोर कारवाई करावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले. सार्वजनिक दिवाबत्ती आणि पाणीपुरवठा योजनेच्या चालू बिलाची थकबाकी वसूल करण्याचे आदेश देण्यात आले.
यावेळी नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, चंद्रपूरचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे, अकोलाचे मुख्य अभियंता अनिल डोये, गोंदियाचे मुख्य अभियंता बंडू वासनिक, अमरावतीचे मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, नागपूर परिक्षेत्र कार्यालयातील अधीक्षक अभियंते हरीश गजबे, अविनाश सहारे, उपमहाव्यवस्थापक (माहिती व तंत्रज्ञान) प्रमोद खुळे उपस्थित होते.
- बॉक्स
- कुठे किती थकबाकी
परिमंडळ थकबाकीदार ग्राहक एकूण थकबाकी
अकोला - ५,८७,८३१- २५७. २३ कोटी रुपये
अमरावती - ५,६८,४२६- २३८.७३ कोटी रुपये
चंद्रपूर - २,६०,७२३, ६६.९० कोटी रुपये,
गोंदिया - १,८३,१९१ - ३५.८६ कोटी रुपये,
नागपूर - ६,१६,८७० - ३२४.९३ कोटी रुपये.