९३ वर्षाच्या वृद्धाने केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 12:10 PM2020-10-10T12:10:01+5:302020-10-10T12:10:21+5:30
Corona Nagpur News महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगरमधून शुक्रवारी ९३ वर्षाचे पद्माकर चवडे कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगरमधून शुक्रवारी ९३ वर्षाचे पद्माकर चवडे कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतले. मागील काही दिवसापासून ते इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये उपचार घेत होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव नागपुरात नियंत्रणात येत आहे तसेच मृत्यू संख्यासुध्दा कमी झाली आहे. कोरोनावर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सहज मात करता येते, असे पद्माकर चवडे यांनी दाखवून दिले आहे. पद्माकर चवडे यांना कोविड - १९ ची लक्षणे दिसल्यानंतर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
मेयो रुग्णालयामध्ये ७ दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली आणि त्यांना मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर येथे भरती करण्यात आले. आई.जी.आर मध्ये त्यांना डॉ. अजय हरदास यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. डॉ. हरदास यांनी सांगितले की, त्यांना आॅक्सिजन सपोर्ट देण्यात आला होता. नंतर त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत झाली आणि त्यांना शुक्रवारी सुटी देण्यात आली.
मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांसाठी १०० हून अधिक बेडसची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे कमी लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना भरती केला जात आहे. सध्या ४१ रुग्णांना उपचार घेत आहे. अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी यांनी आई.जी.आर चे डॉक्टर व स्टाफचे अभिनंदन केले आहे.