बारावीत ९५ टक्के मिळविणारा सलीम करतोय गवंडी काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:01 AM2019-07-14T00:01:00+5:302019-07-14T00:05:02+5:30
परीक्षेचा पॅटर्न बदलला, पेपर कठीण होता, पेपर बरोबर तपासले गेले नाही, अशा प्रकारच्या अनेक सबबी कमी गुण मिळालेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी सांगुन पालकांचे समाधान केले. अशा प्रकराची बोंबाबोंब करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलीम महेबूब शेख या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांने यश केवळ परिश्रम आणि जिद्दीच्या बळावरच मिळू शकते हे दाखवून दिले. कुठलीही शिकवणी न लावता सलीमने बारावीच्या परीक्षेत ९५.४० टक्के गुण मिळविले. विशेष म्हणजे सलीम बांधकाम मजुराचा मुलगा आहे. भविष्यातील शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी वडिलांसोबत गवंडी काम करतो आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परीक्षेचा पॅटर्न बदलला, पेपर कठीण होता, पेपर बरोबर तपासले गेले नाही, अशा प्रकारच्या अनेक सबबी कमी गुण मिळालेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी सांगुन पालकांचे समाधान केले. अशा प्रकराची बोंबाबोंब करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलीम महेबूब शेख या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांने यश केवळ परिश्रम आणि जिद्दीच्या बळावरच मिळू शकते हे दाखवून दिले. कुठलीही शिकवणी न लावता सलीमने बारावीच्या परीक्षेत ९५.४० टक्के गुण मिळविले. विशेष म्हणजे सलीम बांधकाम मजुराचा मुलगा आहे. भविष्यातील शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी वडिलांसोबत गवंडी काम करतो आहे. परिस्थितीची आडकाठी त्याच्यासमोर असली तरी, आयएएस बनण्याची जिद्द त्याने बाळगली आहे.
हिंगणा तालुक्यातील सुकळी बेलदार या गावचा सलीम शेख हा विद्यार्थी आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण जि.प.च्या शाळेत झाले. सहाव्या वर्गात त्याची नवोदय विद्यालयात निवड झाली. तेथूनच त्याने बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याचे वडील मेहबूब शेख हे बांधकामावर मजूर म्हणून काम करतात आणि घरात सहा जणांचे कुटुंब आहे. कमावणारे कुणीच नसल्याने एकट्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. शिक्षणात सलीमने गुणवत्ता मिळविली असली तरी, वडिलांच्या परिस्थितीची त्याला जाणीव आहे. केवळ शिक्षकांचे मार्गदर्शन व मनातील जिद्द व परिश्रम हेच त्याचे भांडवल. त्यामुळे प्रामाणिकपणे तो दररोज सहा तास अभ्यास करायचा. शिक्षणातील प्रगतीच आपली दशा बदलू शकते हा विचार आणि आईवडिलांचे कष्ट याबाबी त्याला प्रेरणा द्यायच्या. गुणवत्तेत आल्यानंतर सलीमच्या कुटुंबाला अत्यंत आनंद झाला. पण परिस्थितीमुळे बाप हतबल झाला. मुलात क्षमता, गुणवत्ता असतानाही उच्च शिक्षण देऊ शकत नाही, ही खंत त्यांना बोचते आहे.
परिस्थितीमुळे व्यावसायिक शिक्षणाचा मार्ग निवडला नाही
सलीमला वडिलांच्या कष्टाची जाणीव आहे. त्याने घरच्यांना धीर देत एक दिवस नक्कीच बदल घडवेल असा आशावाद दिला. रिकामा असल्यामुळे वडिलांसोबत गवंडी कामही करायला लागला. शिक्षणासाठी आपण पैसे खर्च करू शकणार नाही या विचाराने त्याने इंजिनीयरिंग व मेडिकलचा मार्गच निवडला नाही. त्याने आता शहरातील शिवाजी विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. परंतु आता गावावरून कॉलेजला दररोज येण्याकरिता लागणारा खर्च, पुस्तके व शैक्षणिक साहित्याकरिताचा खर्च पुढे कुठून करायचा हा प्रश्न त्याला अस्वस्थ करतोय.
परिस्थिती आणि ध्येयाचा संघर्ष
यूपीएससीची परीक्षा देऊन भारतीय प्रशासन सेवेत (आयएएस) दाखल होण्याचे सलीमचे ध्येय आहे. परंतु गरिबीची परिस्थिती आपल्याला आपले ध्येय गाठण्यापासून दूर तर ठेवणार नाही ना याची चिंता त्याला सतावत आहे. त्याची परिस्थिती आणि ध्येयाचा संघर्ष सुरू आहे. या गुणवंत मुलाला त्याचे ध्येय गाठण्यासाठी हवी आहे, समाजाची मदत.