९६ वे मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 07:30 AM2022-01-13T07:30:00+5:302022-01-13T07:30:02+5:30
Nagpur News विदर्भ साहित्य संघाने ९६ व्या संमेलनासाठी वर्धा येथून निमंत्रण पाठवले असून, याबाबतची अधिकृत घोषणा उद्गीर साहित्य संमेलनातच होण्याची शक्यता आहे.
प्रवीण खापरे
नागपूर : नाशिक येथे पार पडलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातच ९५व्या साहित्य संमेलनाचे स्थळ म्हणून लातूर जिल्ह्यातील उद्गीरची घोषणा करण्यात आली. या संमेलनाची तयारी सुरू असतानाच ९६व्या साहित्य संमेलनाचे स्थळही जवळपास निश्चित झाले आहे. विदर्भ साहित्य संघाने या संमेलनासाठी वर्धा येथून निमंत्रण पाठवले असून, याबाबतची अधिकृत घोषणा उद्गीर साहित्य संमेलनातच होण्याची शक्यता आहे.
विदर्भ साहित्य संघाला १४ जानेवारी २०२३ रोजी शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. वि.सा.संघाच्या शतकमहोत्सवाची सुरुवात १४ जानेवारी २०२२ रोजी ९९व्या वर्धापनदिवसापासून होत आहे. त्याअनुषंगाने वर्षभरात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची आखणीही करण्यात आली असून, त्यात शतक महोत्सवी वर्षानिमित्त २०२३ मध्ये ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे आयोजित करण्याचा समावेश करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला वि.सा. संघाच्या वर्धा शाखेने रितसर निमंत्रणही धाडले आहे. महामंडळाचा एकूणच कार्यकारण स्व:भाव बघता, वर्धा येथे ९६वे साहित्य संमेलन होईल, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
आम्ही निमंत्रण धाडले आहे
महामंडळाच्या धोरणानुसार ९६व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनासाठी वर्धा येथून निमंत्रण धाडले आहे. २०२३ मध्ये वि.सा. संघाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्याअनुषंगाने शतक महोत्सवी वर्षात संमेलन विदर्भ साहित्य संघाच्या यजमानपदाखाली व्हावे, अशी आमची इच्छा आहे. आमचे निमंत्रण स्विकारले जाईल, अशी आशा आहे.
- डॉ. रवींद्र शोभणे, कार्याध्यक्ष : विदर्भ साहित्य संघ, नागपूर
शतकमहोत्सवानिमित्त होणारे उपक्रम
विदर्भ साहित्य संघाच्या शतक महोत्सवाला १४ जानेवारी २०२२ रोजी ९९ व्या वर्धापनदिनाला प्रारंभ होत आहे. कानडी साहित्यिक डॉ. एस.एल भैरप्पा, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोधर मावजो यांचा सत्कार व मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
यासोबतच राष्ट्रीय पातळीवरील लेखिका संमेलन, अकोला येथे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन, बहुभाषिक राष्ट्रीय कवि संमेलन, सतीश पेंडसे यांचे वैदर्भिय प्रतिभावंतांचे व्यक्तिचित्र व मीनाक्षी पाटील यांनी साकारलेल्या तैलचित्रांसह अन्य चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन, प्रसिद्ध लेखक व कलावंतांच्या मुलाखती, दोन महत्त्वांच्या नाटकांचे वैदर्भीय कलावंतांच्या साथीने नाट्यप्रयोग, मॅजिस्टिक पब्लिशिंग हाऊसचे संपादक कै. केशवराव कोठावळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘मॅजिस्टिक गप्पा’ असे भरगच्च उपक्रम वि.सा. संघाने आखले आहेत.
यासोबतच डॉ. राजेंद्र डोळके संपादित ‘वैदर्भीय संशोधक व संशोधन’, डॉ. रवींद्र शोभणे संपादित ‘१९८०नंतरच्या कथाकारांच्या कथा’, डॉ. तिर्थराज कापगते संपादित ‘झाडी बोली : इतिहास व स्वरूप’, डॉ. सतीश तराळ संपादित ‘वऱ्हाडी बोली : परंपरा व इतिहास’, डॉ. श्याम माधव धोंड संपादित ‘ऐंशीनंतरची मराठी कविता’ व डॉ. विलास देशपांडे संपादित ‘विदर्भ साहित्य संघाचा प्रारंभापासूनचा इतिहास’ ही पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत.
.............