दिव्यांगांच्या ९७ मोटराईज्ड ट्रायसिकल पंचायत समितीत पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:06 AM2021-01-10T04:06:45+5:302021-01-10T04:06:45+5:30
नागपूर : समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना मोटराईज्ड ट्रायसिकल देण्यात येतात. परंतु दोन वर्षापासून या ट्रायसिकल पंचायत समितीत पडून ...
नागपूर : समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना मोटराईज्ड ट्रायसिकल देण्यात येतात. परंतु दोन वर्षापासून या ट्रायसिकल पंचायत समितीत पडून असल्याने ट्रायसिकलच्या बॅटरी खराब झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रायसिकलसाठी दिव्यांग लाभार्थीच मिळाले नसल्याने त्या वाटप करण्यात आल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे. पंचायत समितीत पडून असलेल्या या ट्रायसिकल भाजपाची सत्ता असतानाच्या काळातील आहे. ट्रायसिकलसाठी अर्जच आले नाही तर खरेदी का केल्या, असा सवाल सध्या सत्तेत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. हिंगणा पंचायत समितीअंतर्गत २५ सायकली धूळ खात पडून असल्याचे सभापती उज्ज्वला बोढारे यांच्या लक्षात आले. त्यांनी यासंदर्भात स्थायी समितीमध्ये प्रश्न उपस्थित करून जिल्ह्यातील १३ ही पंचायत समितीचा आढावा घेतला. त्यात लक्षात आले की २०१८-१९ व २०१९-२० या काळात ९७ मोटराईज्ड ट्रायसिकल दिव्यांगांना वाटप करण्यात आल्या नाही. ट्रायसिकलसाठी लाभार्थ्यांचे अर्जच आले नाही, तर त्या खरेदी का केल्या. तत्कालीन समाजकल्याण अधिकारी व समाजकल्याण सभापतींवर त्यांनी आक्षेप घेतला आहे. दिव्यांगांच्या ट्रायसिकल खरेदीत गैरव्यवहार झाला असल्याचाही आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
- या ट्रायसिकल भाजप सत्तेत असतानाच्या आहेत. त्यांनी का वाटल्या नाही, यासंदर्भात अधिकाऱ्यांकडून एवढेच सांगण्यात आले की, लाभार्थी मिळाले नाही. सध्या ट्रायसिकलच्या बॅटरी उतरल्या आहेत. आम्ही लवकरात लवकर दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्ज मागविणार आहोत व बॅटरी बदलवून लाभार्थ्यांना वाटणार आहोत.
रश्मी बर्वे, अध्यक्ष, जि.प. नागपूर
- पंचायत समितींमध्ये पडून असलेल्या ट्रायसिकल
पं.स. ट्रायसिकलची संख्या
कळमेश्वर ९
मौदा १६
नागपूर ग्रामीण ६
सावनेर ८
भिवापूर २
नरखेड ७
पारशिवनी ०
कामठी ३
काटोल ११
रामटेक ०
कुही २
उमरेड ८
हिंगणा २५