राज्यात एमबीबीएसच्या वाढल्या ९७० जागा : सरसकट १० टक्क्यांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:15 AM2019-06-22T00:15:00+5:302019-06-22T00:15:01+5:30
महाराष्ट्रातील शासकीय व खासगी महाविद्यालयातील एमबीबीएसच्या ९७० वाढीव जागांना अखेर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) मंजुरी दिली. यामुळे आता राज्यात एमबीबीएसच्या २७६० वरून ३७३० जागा झाल्या आहेत. या जागा नव्याने लागू होणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (ईडब्ल्युएस) अंतर्गत वाढविण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रातील शासकीय व खासगी महाविद्यालयातील एमबीबीएसच्या ९७० वाढीव जागांना अखेर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) मंजुरी दिली. यामुळे आता राज्यात एमबीबीएसच्या २७६० वरून ३७३० जागा झाल्या आहेत. या जागा नव्याने लागू होणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (ईडब्ल्युएस) अंतर्गत वाढविण्यात आल्या आहेत.
वैद्यकीय पदव्युत्तर पदवी (पीजी) आणि आता एमबीबीएस (पदवी) प्रवेशाचा प्रश्न चिघळल्यानंतर अखेर राज्य सरकारने राज्यात एमबीबीएसच्या जागा वाढविण्याची मान्यता केंद्राकडून मिळवण्यात यश मिळवले. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी १५ जून रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची दिल्लीत भेट घेऊन महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण विभागासाठी काही प्रस्ताव सादर केले. त्यानंतर या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली. डॉक्टरांची संख्या लक्षात घेता महाराष्ट्रातील शासकीय व खासगी महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या जागा वाढविण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार ‘एमसीआय’ने ‘ईडब्ल्युएस’ अंतर्गत एमबीबीएसच्या वाढविण्यात आलेल्या जागेचा मंजुरीचे पत्र ई-मेलवर शुक्रवारी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांना प्राप्त झाले. यात शासकीय व खासगी मिळून २० वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या जागांमध्ये सरसकट १० टक्क्यांनी वाढ करण्यात आली. १७ महाविद्यालयातील एमबीबीएसच्या ५० जागांची वाढ करण्यात आली, तर सर्वाधिक ७० जागा जीएस. मेडिकल कॉलेज, मुंबईच्या वाढविण्यात आल्या. यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात एमबीबीएसच्या ३७३० जागांवर प्रवेश देण्याचा मार्ग खुला झाला आहे.
या महाविद्यालयांच्या वाढल्या जागा
बी.जे.वैद्यकीय महा., पुणे २५०
डॉ. वैशंपायन स्मृती शा. वैद्यकीय महा., सोलापूर २००
डॉ. शंकरराव चव्हाण शा. वैद्यकीय महा., नांदेड १५०
शा. वैद्यकीय महा., अकोला २००
शा. वैद्यकीय महा., औरंगाबाद २००
शा. वैद्यकीय महा., चंद्रपूर १५०
शा. वैद्यकीय महा., गोंदिया १५०
शा. वैद्यकीय महा., जळगाव १५०
शा. वैद्यकीय महा., मिरज २००
शा. वैद्यकीय महा. नागपूर २५०
ग्रॅण्ट वैद्यकीय महा. मुंबई २५०
एच.बी.टी. वैद्यकीय महा. मुंबई २००
इंदिरा गांधी शा. वैद्यकीय महा. नागपूर २००
लोकमान्य टिळक महापालिका वैद्यकीय महा., मुंबई २००
राजीव गांधी वैद्यकीय महा., ठाणे ८०
जीएस वैद्यकीय महा., मुंबई २५०
वसंतराव नाईक शा. वैद्यकीय महा., यवतमाळ २००
भाऊसाहेब हिरे शा. वैद्यकीय महा., धुळे १५०
वैद्यकीय महा., आंबेजोगाई १५०
टोपीवाला नॅशनल वैद्यकीय महा., मुंबई १५०