१.९५ कोटी रुपये किमतीचा ९७५ किलो गांजा जप्त; - महसूल गुप्तचर संचालनालय नागपूर युनिटची कारवाई
By मोरेश्वर मानापुरे | Published: February 6, 2024 08:38 PM2024-02-06T20:38:27+5:302024-02-06T20:38:34+5:30
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) नागपूर युनिटने नागपूरजवळील बोरखेडी टोल प्लाझावर आलेल्या एका ट्रकवर कारवाई करून १ कोटी ९५ लाख रुपये किमतीचा ९७५.५ किलो गांजा जप्त केला.
नागपूर : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) नागपूर युनिटने नागपूरजवळील बोरखेडी टोल प्लाझावर आलेल्या एका ट्रकवर कारवाई करून १ कोटी ९५ लाख रुपये किमतीचा ९७५.५ किलो गांजा जप्त केला. अधिकाऱ्यांच्या टीमने ही कारवाई ६ फेब्रुवारीला पहाटे केली.
ट्रकची बारकाईने तपासणी केली असता ९७५.५ किलो वजनाची गांजाची एकूण ४७८ पाकिटे वर्मी कंपोस्टच्या पोत्यांच्या खाली लपवून ठेवलेली आढळून आली. ड्रग डिटेक्शन टेस्टिंग किटद्वारे चाचणी केल्यावर पकडलेला पदार्थ गांजा असल्याचे सिद्ध झाले.
संशयित गांजाची किंमत १.९५ कोटी रुपये आहे. ट्रक चालवणाऱ्या एका व्यक्तीला एनडीपीएस कायद्याच्या तरतुदीनुसार अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
या संशयित अंमली पदार्थांचा पुरवठा करणारे आणि प्राप्त करणाऱ्यांना पकडण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. अंमली पदार्थांवर सतत लक्ष ठेवण्यासाठी आणि सायकोट्रॉपिक पदार्थांच्या धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी डीआरआय कटीबद्ध असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.