श्रमिक स्पेशल; बिकट परिस्थितीतील ९७७ कामगार नागपूरहून लखनौला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 09:29 PM2020-05-03T21:29:50+5:302020-05-03T21:37:45+5:30
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य शासनाच्या सुचनेनंतर रविवारी सायंकाळी ७.३० वाजता नागपूरवरून लखनऊसाठी २४ कोचची श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी सोडण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे हजारो कामगार जागोजागी अडकुन पडले होते. यातील अनेक कामगार पायीच गावाकडे जात आहेत. परंतु आता राज्य शासनाने अर्ज केल्यानंतर रेल्वेच्या वतीने श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून त्यांना आपल्या गावाकडे पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य शासनाच्या सुचनेनंतर रविवारी सायंकाळी ७.३० वाजता नागपूरवरून लखनऊसाठी २४ कोचची श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी सोडण्यात आली.
श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीतून नागपुरातील २२७, चंद्रपूरचे २८९, वर्धाचे २२०, गडचिरोली येथील १०८, भंडाराचे १३७ असे एकुण ९७७ कामगार रवाना झाले. त्यांच्या कडून रेल्वेला तिकीटांच्या माध्यमातून ४ लाख ९३ हजार ३८५ रुपयांचे उत्पन्न मिळाले. या कामगारांना विविध शेल्टर होम आणि ठिकाणांवरून ३० बसेसने नागपूर रेल्वेस्थानकावर आणण्यात आले. सायंकाळी ७ वाजेपर्यंत कामगार रेल्वेस्थानकावर येणे सुरु होते. रेल्वेस्थानकावर या कामगारांना भोजन, पिण्याचे पाणी देण्यात आले. शारिरीक अंतर ठेऊन त्यांना श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीत बसविण्यात आले. अजनी यार्डात ठेवण्यात आलेली श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी सकाळीच निर्जंतुकीकरण करून नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर आणण्यात आली. सायंकाळी ७.१५ वाजता नागपुरचे पालकमंत्री नितीन राऊत नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचले. त्यांनी प्लॅटफार्म क्रमांक १ वर सायंकाळी ७.३० वाजता रेल्वेगाडी सुटल्यानंतर हात जोडून सर्व कामगारांना निरोप दिला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे नोडल अधिकारी शिरीष पांडे, अविनाश कातडे, निता चौधरी, रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पाण्ड्येय, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस. जी. राव, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, आरपीएफचे निरीक्षक रवी जेम्स, उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, उपस्टेशन व्यवस्थापक अतुल श्रीवास्तव, दत्तु घाडगे, प्रवासी सुुविधा पर्यवेक्षक प्रविण रोकडे, लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक संदीप गोंडाणे आदी अधिकारी उपस्थित होते.
तिकिटांचे पैसे घेणे चुकीचे : नितीन राऊत
‘लॉकडाऊनमुळे ४० दिवस कामगारांचा रोजगार बुडाला. त्यांच्या खात्यात पैसे नव्हते. अशा स्थितीत रेल्वेने त्यांच्याकडून तिकिटांचे पैसे वसुल करणे चुकीचे आहे. याबाबत आपण आजच पत्र लिहून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांना माहिती दिली आहे. सोबतच नागपुरातून तसेच इतर ठिकाणावरून जाणाऱ्या कामगारांच्या तिकिटांसाठी आपल्या वतीने ५ लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत, अशी माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली. श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीत शारीरीक अंतर ठेवण्याबाबत योग्य व्यवस्था न केल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.’
माध्यमांना आत जाण्यापासून रोखले
श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीचे वृत्त््राांकन करण्यासाठी आलेल्या प्रसार माध्यमांना रेल्वेस्थानकाच्या आजुबाजुला रोखण्यात आले. चौकशी अंती रेल्वे प्रशासनानेच पोलिसांना अशा सुचना केल्याची माहिती मिळाली. याबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांना विचारना केली असता त्यांनी प्रसार माध्यमांना प्रवेश देण्यात येत नसून श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीबाबत प्रसिद्धीपत्रक पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रसार माध्यमांचे जे प्रतिनिधी रेल्वेस्थानकावर पोहोचले त्यांनाही प्लॅटफार्मवर जाण्यास रोखण्यात आले.