महाविद्यालयांच्या चुकीमुळे शिष्यवृत्तीचे ९८ कोटी परत गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:29 AM2020-11-22T09:29:08+5:302020-11-22T09:29:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाविद्यालयाच्या चुकीचा फटका गरीब, मागास विद्यार्थ्यांना बसत आहे. महाविद्यालयांनी योग्यप्रकारे अर्ज न भरल्याने शिष्यवृत्तीचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाविद्यालयाच्या चुकीचा फटका गरीब, मागास विद्यार्थ्यांना बसत आहे. महाविद्यालयांनी योग्यप्रकारे अर्ज न भरल्याने शिष्यवृत्तीचे ९८ कोटी रुपये शासनाकडे परत गेल्याने लाखो विद्यार्थी शिष्यवृत्ती लाभापासून वंचित राहिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. समाजकल्याण विभागाने अशा महाविद्यालयांना समज दिली असून पुन्हा असे झाले तर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
मागास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याकरता शिष्यवृत्तीची व्यवस्था करून देण्यात आली. अनुसूचित जाती, ओबीसी वर्गांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर येणार खर्च शासनाकडून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून देण्यात येतो. परंतु गेल्या काही वर्षांत शासनाकडून नियमितपणे रक्कम देण्यात येत नाही. यामुळे विद्यार्थांंची मोठी कोंडी होत आहे. ज्या संस्थांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या संस्थांमधील संचालक शिक्षण शुल्क भरण्यासाठी तगादा लावत आहे. त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची जबाबदारी महाविद्यालयांची आहे. त्यांच्याकडून योग्यप्रकारे अर्ज न भरल्याने लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. म्हणून महाविद्यालयांकडून शुल्कासाठी तगादा लावण्यात येतो. यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याची वेळ आल्याचे सांगण्यात येते. महाविद्यालयांच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे ९८ कोटी रुपये शासनास परत गेले. यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर विभागील ५ हजार विद्यार्थ्यांंचे अर्ज अद्याप महाविद्यालयातच पडून आहेत.
काेट
शिष्यवृत्तीचे ९८ कोटी रुपये शासनास परत आले. यात महाविद्यालयांची चुकी आहे. त्यामुळे अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांकडून परीक्षा व इतर शुल्काची नियमबाह्य वसुली करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याचे आदेश सहाय्यक आयुक्तांना दिले.
डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाजकल्याण विभाग