९८ टक्के मातांना मिळाले जीवनदान!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 06:16 AM2020-03-02T06:16:02+5:302020-03-02T06:17:11+5:30
प्रसूतीनंतर होणारा अतिरक्तस्राव, जंतुसंसर्ग, उच्चरक्तदाब आणि अॅनिमियामुळे राज्यात मातामृत्यूचे प्रमाण वाढत आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : प्रसूतीनंतर होणारा अतिरक्तस्राव, जंतुसंसर्ग, उच्चरक्तदाब आणि अॅनिमियामुळे राज्यात मातामृत्यूचे प्रमाण वाढत आहे. ३८ टक्के मृत्यू तर केवळ प्रसूतीनंतर होणाऱ्या अतिरक्तस्रावामुळे होतात. हे मृत्यू थांबविण्यास नागपूर मेडिकलने ‘क्वालिटी पीपीएच इमर्जन्सी केअर’ हा प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पामुळे अतिरक्तस्रावामुळे होणारे ९८ टक्के मातामृत्यू रोखण्यास यश मिळाले आहे. ‘हावर्ड युनिव्हर्सिटी’च्या सहकार्याने तयार केलेल्या या प्रकल्पाला राज्यात ‘मॉडेल’ म्हणून पाहिले जात आहे. लवकरच हा प्रकल्प उत्तर प्रदेश व बांगलादेश येथे राबविण्यात येईल.
गेल्या वर्षात अतिरक्तस्रावामुळे होणाºया मातामृत्यूचा दर हा तब्बल ९७ टक्के होता. यावर मेडिकलच्या स्त्री रोग व प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ. जे. आय. फिदवी व डॉ. आशिष झरारिया यांनी अभ्यास केला. यावर उपाययोजना करण्यासाठी ‘पोस्टमार्टम हेमरेज’वर काम करणारे ‘हावर्ड युनिव्हर्सिटी’चे डॉ. थॉमस बर्ग व ‘एमजीआयएमएस’ रुग्णालय सेवाग्राम वर्धा येथील डॉ. पूनम शिवकुमार यांची मदत घेण्यात आली. त्यांच्या सहकार्याने ‘क्वालिटी पीपीएच इमर्जन्सी केअर’ प्रकल्प तयार करण्यात आला.
>असे आहे ‘क्वालिटी पीपीएच इमर्जन्सी केअर’
याअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील काही रुग्णालयांना ‘हॉटलाइन’ नंबरशी जोडले आहे. अतिरक्तस्रावाची माता आल्यास ते ‘हॉटलाइन’द्वारे ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’शी संवाद साधतात. आपत्कालीन स्थितीत महिलेला मेडिकलमध्ये हलविले जाते.
>उत्तर प्रदेश, बांगलादेशमध्येही राबविणार प्रकल्प
महाराष्टÑात शासकीय रुग्णालयात ‘क्वालिटी पीपीएच इमर्जन्सी केअर’ हा प्रकल्प ‘मॉडेल’ म्हणून पाहिला जात आहे. उत्तर प्रदेश, बांगलादेशातही हा प्रकल्प प्रायोगिक स्तरावर राबविला जाणार आहे.
- डॉ. आशिष झरारिया, स्त्री रोग व प्रसूती विभाग, मेडिकल